प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरासाठी मिळणार मोफत

पाणी नेण्यासाठी ‘कलर कोड’ असलेला टँकर बंधनकारक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th June, 12:22 am
प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरासाठी मिळणार मोफत

पणजी : राज्यातील ९ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतून प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा वापरण्यासाठी मोफत देण्यात येणार आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरता येणार नाही. या पाण्याचा वापर बागकाम, रस्ते धुणे, बांधकाम प्रकल्प, उद्योगात तसेच खासगी वापरासाठी करता येणार आहे. प्रकल्पातून असे पाणी नेण्यासाठी कलर कोड असलेला टँकर वापरणे बंधनकारक आहे. राज्यात दरदिवशी प्रक्रिया केलेले ७८ दशलक्ष लिटर पाणी वापरण्यास उपलब्ध असेल. याबाबत अर्थ खात्याने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार प्रक्रिया केलेले सांडपाणी सार्वजनिक उद्याने, खासगी बागा, रस्त्याच्या कडेला असलेल्या बागा आदी ठिकाणी वापरता येईल. रस्ते तसेच पदपथांच्या स्वच्छतेसाठी या पाण्याचा वापर करता येईल. उद्योगांमध्ये यंत्र थंड करण्यासाठी, कुलिंग टॉवर्समध्ये भरण्यासाठी, फरशी धुण्यासाठी, काँक्रिट बनवण्यासाठी, मातीचे कम्पॅक्शन करण्यासाठी, धूळ नियंत्रण करण्यासाठी हे पाणी वापरता येणार आहे. हॉटेलना बागकाम, पदपथ धुणे आणि इतर पिण्यायोग्य नसलेल्या वापरासाठी हे पाणी वापरता येईल.
बांधकामाशी संबंधित कामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरून पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याची ५० टक्के मागणी पूर्ण करणे अपेक्षित आहे. बांधकाम सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापासून १५ किमी अंतरावर असणे आवश्यक आहे. बांधकामात काँक्रिट क्युअरिंग, माती कम्पॅक्शन करणे, रस्तेकाम इत्यादीसाठी याचा वापर होऊ शकतो. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पीएच ६ ते ८ दरम्यान असेल. या पाण्यातील फिकल कॉलिफॉर्म प्रति १०० मिलीलिटरमध्ये १०० पेक्षा अधिक आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी बागा, पणजी, साखळी, मडगाव, वास्को, दुर्भाट, कोलवा आणि कवळे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर उपलब्ध होणार आहे.

पिण्यासाठी वापरता येणार नाही!
अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रक्रिया केलेले सांडपाणी केवळ पिण्यायोग्य नसलेल्या वापरासाठीच आहे. असे पाणी पिण्यासाठी वापरता येणार नाही. याची वाहतूक पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या टँकरमधून करता येणार नाही. पाणी पंपिंग करण्यासाठी एसटीपीवर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. अधिक माहितीसाठी पणजी येथील सांडपाणी आणि मूलभूत विकास महामंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन अर्थ खात्याने केले आहे.       

हेही वाचा