नद्यांसंदर्भात जारी ‘डीपीआर’ला गोवा फॉरवर्डचा विरोध!

विजय सरदेसाई : केंद्र, राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा


01st June, 11:10 pm
नद्यांसंदर्भात जारी ‘डीपीआर’ला गोवा फॉरवर्डचा विरोध!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील मांडवी, झुआरी, शापोरा नद्यांसह कुंभारजुवे नाल्याचे पात्र वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) गोवा फॉरवर्डचा विरोध आहे, असे पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
केंद्र सरकारने मांडवी, झुआरी, शापोरा नद्यांसह कुंभारजुवे नाल्याचे पात्र वाढवण्याच्या कामासाठी ३१० कोटींचा ‘डीपीआर’ तयार केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पूर येतो. पावसाचे पाणी साचून राहते. अशा स्थितीत केंद्राने तयार केलेल्या ‘डीपीआर’नुसार कामे सुरू झाल्यास त्याचा मोठा फटका स्थानिक जनता, मच्छीमार आ​णि बार्ज मालकांना बसणार आहे. त्यामुळे या ‘डीपीआर’ला गोवा फॉरवर्डने विरोध दर्शवला आहे, असे आमदार सरदेसाई म्हणाले.
केंद्र सरकारने हा ‘डीपीआर’ केवळ राज्यातून कोळसा वाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी केला आहे. याबाबत गोमंतकीयांची राज्य सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांनीही या ‘डीपीआर’विरोधात उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गोमंतकीयांना हवे गोंयकारवादी सरकार!
गेल्या लोकसभा निवडणुकीत​ भाजपला धडा शिकवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी गोमंतकीयांची इच्छा होती. त्यानुसार सर्व विरोधक एकत्र झाले. त्याचा दक्षिण गोव्यात फायदाही मिळाला. सध्या गोव्यातील जनता भाजप सरकारवर नाराज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेला पर्याय हवा आहे. हा पर्याय राष्ट्रीय की प्रादेशिक पक्ष याचा निर्णय जनता पुढील वर्षभरात घेईल. पण, गोमंतकीयांना गोंयकारवादी सरकार हवे, असेही विजय सरदेसाई यांनी नमूद केले.