केरळमधून गोव्याच्या दिशेने कूच : कोणत्याही क्षणी होणार दाखल
पणजी : शासकीय स्तरावर गोव्यातील मान्सूनपूर्व कामे अजून पूर्ण व्हायची आहेत. काही ठिकाणी ती अजून सुरू व्हायची आहेत. सर्वसामान्यांची पावसापूर्वी घराची कौले परतण्यापासून ते पावसाळ्यात लागतील त्या गोष्टी साठवण्यासाठीचे 'पुरुमेंत' करेपर्यंत सर्वच कामे बाकी आहे. अशातच गोवेकरांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. हा अवकाळी पाऊस ओसरण्यापूर्वीच मान्सूनची त्यात भर पडत आहे. केरळमध्ये शनिवारी दाखल झालेला मान्सून कर्नाटक, तामिळनाडूच्या काही भागांतही पोहचला. त्यामुळे गोव्यात कुठल्याही क्षणी तो दाखल होईल. मान्सून दाखल होणे म्हणजे अधिकृतपणे पावसाळा सुरू. पावसापूर्वीची आवराआवर करण्याचीही संधी पावसाने गोवकेरांना दिलेली नाही.
मान्सून साधारपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पण, यंदा मात्र आठ दिवस आधीच त्याने केरळात हजेरी लावली. याआधी २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर सोळा वर्षांनी इतक्या अगोदर मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली. केरळमधून मान्सूनची वाटचाल कर्नाटक, तामिळनाडू, गोव्याच्या दिशेने सुरू आहे. हवामानातील बदलांमुळे तो अडकला नाही, तर पुढील एक-दोन दिवसांत कोणत्याही क्षणी तो गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यापूर्वी मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तसेच बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदलांमुळे मान्सूनची गती वाढली. मान्सूनने २३ मे रोजी श्रीलंकेला व्यापले होते. त्यानंतर एकाच दिवसात तो संपूर्ण केरळ, तमिळनाडूचा बहुतांशी भाग, कर्नाटकचा किनारी भाग तसेच मिझोरमच्या काही भागांत पोहोचल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमधील १४ हवामान केंद्रांत १० मे नंतर सलग दोन दिवस २.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यास तसेच वाऱ्याचा ठराविक वेग कायम राहिल्यास मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात येते. दरम्यान, हवामान खात्याने गोव्यात शनिवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. पण, बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.