२४ जूनपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम : स्थानिक कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी
पणजी : सरकारी पातळीवर होणाऱ्या सांजाव, चिखलकाला, दीपोत्सवसाठी पर्यटन खात्याने ३.३९ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यात सांजावच्या आयोजनासाठी ९० लाख रुपये, चिखलकाल्याच्या आयोजनासाठी १ कोटी ४९ लाख, तर दीपोत्सवच्या आयोजनासाठी १ कोटी रुपयांच्या निविदेचा समावेश आहे. सरकारी पातळीवरील सांजाव २४ जून रोजी चिखलकाला जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तर दीपोत्सव ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जाईल.
पर्यटन खात्याने काढलेली निविदा ही आरएफक्यू स्वरूपाची आहे. एजन्सीचा प्रस्ताव पसंत पडला तरच पुढील निविदा काढण्यात येणार आहे. सांजाव महोत्सव शिवोली किंवा अन्यत्र होणार आहे. महोत्सव २४ जून रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत असेल. कार्यक्रमात सांजाव शिवाय गोमंतकीय संस्कृती दाखवणारे नृत्य प्रकार, गाणी, खाद्य पदार्थ, स्थानिक पेये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच येथे हस्तकला व कृषी विभाग, कार्यशाळा आणि मास्टर क्लास, प्रात्यक्षिके अशा विविध घटकांचा समावेश असेल.
ऑक्टोबर महिन्यात आयोजित होणाऱ्या दीपोत्सवासाठी पर्यटन खात्याने १ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. प्राधान्याने पर्वरी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक आकाश कंदीलांची सजावट केली जाईल. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पारंपरिक गोमंतकीय नृत्यांचे सादरीकरण होईल. तिसऱ्या दिवशी रात्री १० नंतर प्रसिद्ध नरकासुर स्पर्धा सुरू होईल आणि पहाटे ४ ते ५.३० दरम्यान नरकासुराची प्रतिमा जाळली जाईल. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी सुमारे १० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, पर्यटन खात्याच्या या उपक्रमामुळे गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल, तसेच पर्यटकांना राज्याच्या विविध रंगांची आणि परंपरांची ओळख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चिखलकालाची तारीख लवकरच होणार जाहीर
चिखलकाला हा दोन दिवसीय महोत्सव जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात माशेल येथील मैदानावर किंवा अन्यत्र आयोजित केला जाईल. महोत्सवाची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल. चिखलकालामध्ये स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गोमंतकीय संस्कृती दाखवणारे पारंपरिक नृत्य प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पेये उपलब्ध असतील.