मुख्य सूत्रधाराच्या शोधात पर्वरी पोलीस पथक कोलकाताला रवाना

समग्र शिक्षा अभियानात ५ कोटींची अफरातफर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th May, 12:49 am
मुख्य सूत्रधाराच्या शोधात पर्वरी पोलीस पथक कोलकाताला रवाना

म्हापसा : समग्र शिक्षा अभियानाच्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून पाच कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी पर्वरी पोलीस कोलकाताला रवाना झाले असून या गुन्ह्यात ८ ते १० जणांच्या टोळक्याचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हा अफरातफरीचा प्रकार गेल्या मार्च २०२५ मध्ये घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी समग्र शिक्षा अभियानाचे संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पश्चिम बंगाल मधील रॉबिन पॉल यास अटक केली आहे. संशयिताच्या बँक खात्यात या अफरातफरीतील १.८ कोटी रुपये रक्कम हस्तांतरित झाली होती.
संशयित आरोपी रॉबीन पॉल याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली व तो कोलकाता येथे असल्याची माहिती हाती लागली असता पर्वरी पोलीस संशयिताला पकडण्यासाठी कोलकाताला रवाना झाले आहेत.
कुशन व्यापारी असलेला संशयित आरोपी पॉल याला व्यवसायासाठी बँक कर्ज हवे होते. ते मिळवून देण्यासाठी आपली रक्कम तुमच्या बँक खात्यातून हस्तांतरित करून द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती. त्यानुसार फरार संशयिताने पॉल यांच्या बँक खात्यात अफरातफरीची रक्कम पाठवली आणि नंतर ती १.८ कोटी रुपये रक्कम लगेच वठवली. मात्र, नंतर कर्ज मिळवून न देताच संशयित गायब झाला. तर पॉल हा पोलिसांच्या तावडीत सापडला. संशयिताने पॉल यांच्यासह अजून चार-पाच जणांच्या बँक खात्यात ही अफरातफरीची रक्कम हस्तांतरित केलेली आहे. त्यामुळे ही टोळी ८ ते १० जणांची असावी, असा संशय पोलिसांना आहे.
बँक अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
पणजीतील एका बँक अधिकार्‍यांच्या दक्षतेमुळे हा अफरातफरीचा प्रकार उघडकीस आला. अन्यथा संशयित समग्र शिक्षा अभियानाचे खाते रिकामी करण्यास यशस्वी ठरले असते.
बनावट सही करून पणजीतील बँकांमध्ये हस्तांतरण
- संशयित आरोपींनी समग्र शिक्षा अभियानाच्या बँक खात्यातील फोन क्रमांक प्रथम बदलला व नंतर फिर्यादी संचालक व एका अधिकार्‍यांची धनादेशावर बनावट सही केली.
- या धनादेशांवर लाखो रुपये रक्कम लिहून ती पणजीमधील काही बँकांमधून हस्तांतरित केली.
 हे बँक धनादेश लवकर वठवले जावेत म्हणून संशयितांनी धनादेशासमवेत आरटीजीएस स्लिपही पावती लिहून दिली होती. त्यामुळे ही टोळी बँक व्यवहाराशी निगडीत असावी, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.