बुडणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकाचा बुडून मृत्यू!

सांतिनेज - पणजीतील दुर्घटना; पोलिसांकडून तपास सुरू


24th May, 12:45 am
बुडणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकाचा बुडून मृत्यू!

सांतिनेज येथील तळीच्या ठिकाणी पंचनामा करताना पोलीस.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : सांतिनेज येथील श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानच्या मागे असलेल्या तळीत बुडालेल्या युवकाला वाचविण्यासाठी गेलेला युवकच बुडण्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. यात सांताक्रूझ येथील साई वैभव वायंगणकर (२७) याचा मृत्यू झाला. दरम्यान वाचविण्यात आलेल्या युवकावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २३ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सांतिनेज येथील श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानच्या मागे असलेल्या तळीवर चार ते पाच युवक अंघोळ करण्यासाठी आले होते. याच दरम्यान त्यातील जाॅनाथोन हा युवक तळीत बुडाला. सदर युवकाला वाचविण्यासाठी साई वैभव वायंगणकर या युवकाने तळीत उडी मारली आणि जॉनाथोनला सुखरूप बाहेर काढले. मात्र वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नाईक व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
वाचविलेल्या युवकाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. साई वैभव वायंगणकर याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.