अधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांनी वटवले कोटींचे धनादेश

संशयित पॉलला कोठडी : समग्र शिक्षा अभियानातील घोटाळ्याने खळबळ


24th May, 12:44 am
अधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांनी वटवले कोटींचे धनादेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या गोव्याच्या बँक खात्यात सुमारे कोटींची अफरातफर झाल्याने ​राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, दोन अधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांच्या माध्यमातून कोटींचे धनादेश वटवल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी समग्र शिक्षा अभियानाच्या चार कर्मचाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्यात आला आहे. पर्वरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, पश्चिम बंगालमधील कापड व्यावसायिक रॉबिन एल. पॉल (४१) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून पोलीस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. समग्र शिक्षा अभियानाच्या खात्यातून निधी वैयक्तिक खात्यात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर गोवा सर्व शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पर्वरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सीताराम मळीक यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, समग्र शिक्षा अभियानाच्या बँक खात्यातून १.८ कोटींची रक्कम पश्चिम बंगालमधील रॉबिन पॉल याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार उपनिरीक्षक मळीक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक १८ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये रवाना करण्यात आले होते. पथकाने संशयित पॉल याच्या मुसक्या आवळल्या असून तेथील न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला गोव्यात आणण्यात आले आहे. दरम्यान, म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने संशयित पॉल याला ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकल्प संचालक शंभू घाडी म्हणाले...
या घोटाळ्यात गोवा समग्र शिक्षा अभियानाचे बोगस धनादेशही तयार करण्यात आले होते. त्यावर आपल्या आणि अभियानाच्या लेखा विभागाच्या सीईओच्या नकली सह्या आहेत. त्याच क्रमांकाचे खरे धनादेश आमच्याकडे आहेत.
गोवा समग्र शिक्षा अभियानाच्या खात्याची संपूर्ण माहिती संबंधित बँकेकडेच होती. पोलीस याप्रकरणी तपास करत असून, तपासानंतरच सर्व माहिती समोर येईल.