जिल्हाधिकार्यांचा आदेश : ६० दिवसांसाठी निर्बंध
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : पावसाळ्यात दक्षिण गोव्यातील खाणींचे खंदक, नद्या, तलाव व इतर नैसर्गिक जलसाठ्याच्या ठिकाणी पर्यटक व स्थानिक भेटी देतात. बुडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी दक्षिणेतील नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्रवेशाला ६० दिवसांसाठी बंदी असेल. यावर पोलीस व मामलेदारांनी लक्ष ठेवावे, असे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी शुक्रवारी जारी केले आहेत.
आदेशानुसार खाणींचे खंदक, नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पोहणे, आंघोळ करणे किंवा प्रवेश करण्यास मनाई आहे. पावसाळ्यात विविध नैसर्गिक जलसाठ्यांना स्थानिकांसह पर्यटक भेटी देत असतात. पोलिसांनी सूचना फलकांद्वारे सावधगिरी बाळगण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, नैसर्गिक जलसाठ्यात प्रवेश करणे सुरू आहे. पाण्याची खोली, निसरडा रस्ता, अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह यामुळे पाण्यात जाणे धोकादायक ठरत आहे. गेल्यावर्षी सांगे, मुरगाव, धारबांदोडा भागात बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्रवेश बंदी करण्यासाठीचा आदेश जारी करण्याची शिफारस दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पोहणे, आंघोळ करणे किंवा प्रवेश करण्यास बंदीचा आदेश जारी केला. हा आदेश पुढील ६० दिवसांसाठी असेल. आदेशाचे उल्लंघन होऊ नये याकडे पोलीस निरीक्षक व मामलेदारांनी लक्ष ठेवावे. आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रकार घडल्यास गुन्हा नोंदवावा. न्यायदंडाधिकार्यांसमोर तक्रारी दाखल कराव्यात, असे आदेशात नमूद आहे.