साहित्य
१ बारीक वाटी भिजवलेली चवळी, १ बारीक वाटी भिजवलेले हिरवे वाटाणे, ४ ते ५ सुरणाचे तुकडे, ४ ते ५ फ्लावरचे तुकडे, ४ ते ५ बटाट्याचे तुकडे, ४ ते ५ कच्च्या पोपईचे तुकडे, ४ ते ५ कच्च्या केळीचे तुकडे, ४ ते ५ कच्चे मके, ४ ते ५ गाजराचे तुकडे, ४ ते ५ भोपळ्याचे तुकडे, ४ ते ५ मुळ्याचे तुकडे, ४ ते ५ नवल कोमचे तुकडे, ४ ते ५ बीटाचे तुकडे, ४ ते ५ शेंगा, ३ ते ४ तिरफाळे, १ बारीक चमचा हळद, चिमुठभर हिंगाची पूड, गूळ, ३ ते ४ सुक्या मिरच्या, ३ ते ४ ओल्या खोबराचे तुकडे, १ बारीक वाटी धने, तेल, १ बारीक चमचा मोहरी, ३ ते ४ कडिपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
प्रथम एका कुकरच्या भांड्यात ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या घ्या जसे की १ बारीक वाटी भिजवलेली चवळी, १ बारीक वाटी भिजवलेले वाटाणे, ४ ते ५ सुरणाचे तुकडे, ४ ते ५ कच्च्या केळीचे तुकडे, ४ ते ५ मक्याचे तुकडे, ४ ते ५ शेंगा, ४ ते ५ नवल कोमचे तुकडे, ४ ते ५ बीटाचे तुकडे घ्या. त्यात ४ ते ५ पेले पाणी घाला आणि या सर्व भाज्या २ ते ३ शिट्यावर शिजवून घ्या. आता ज्या भाज्या लवकर शिजतात त्या भाज्या शिजवून घ्या. तुमच्या आवडीनुसार आणि भाज्या घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं या भाज्या बारीक चिरू नका कारण जेव्हा आपण शिजत घालतो तेव्हा आणि बारीक होतात. आता एका मिक्सरच्या भांड्यात ३ ते ४ ओल्या खोबराचे तुकडे, ३ ते ४ सुक्या मिरच्या, १ बारीक वाटी धने पूड, १ बारीक चमचा हळद, थोडी हिंगाची पूड, थोडं पाणी व हे सगळं मिश्रण छान बारीक करून घ्या. आता एका भांड्यात २ चमचे तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यात ३ ते ४ कडिपत्त्याची पाने घाला. आता यात ज्या आपण मगाशी सगळ्या भाज्या शिजवल्या होत्या त्या सर्व घाला. वाटाणे आणि चवळी पण घाला. आता यात ३ ते ४ तिरफळे, गोडीनुसार गुळ, वाटलेलं मिश्रण, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व अलगत हाताने छान एकत्र करा. जोरात एकत्र करू नका कारण भाज्या सगळ्या दिसल्या पाहिजे. छान उकळी काढा. हे खतखते आपल्या गोव्यात जास्त प्रसिद्ध आहे. तर अश्या प्रकारे गोवन खतखते तयार आहे. तर या रविवारी ही वेगळी रेसिपी नक्की करून पहा.
संचिता केळकर