स्कॉर्पिओ जप्त : वाळपई पोलिसांकडून दोघांना अटक
वाळपई : केरी येथील तपासणी नाक्यावर नाकाबंदी असताना एका स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ४०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले. पोलिसांनी सदर प्रकरणी कारवाई करून कर्नाटक येथील दोघांना अटक केली असून स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे.
कर्नाटक भागातून गोव्यामध्ये येत असताना केरी येथील तपासणी नाक्यावर गेल्या चार महिन्यांत तीन वेळा बेकायदेशीर गोमांस जप्त करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक भागातून गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेळगाव येथून स्कॉर्पिओ (के. ए. ४८ एम-१११७) गाडी गुरुवारी मध्यरात्री कर्नाटक भागातून गोव्यामध्ये येत होती. केरी येथील तपासणी नाक्यावर पोलीस उपनिरीक्षक खुशाली नाईक यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी सुरू होती.या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे देण्यास तो अयशस्वी ठरल्यानंतर स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटक येथील दोघांना अटक केली. वसीम होंगल व साहिल अहमद अख्तर या दोघांचा यात समावेश आहे. त्यांना बेकायदेशीरपणे गोमांसाची वाहतूक करण्याप्रकरणी अटक करण्यात आली.
स्कॉर्पिओ गाडी वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक खुशाली नाईक यांनी सांगितले.
गोमांसाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यावर सदर गोमांसाची विल्हेवाट लावण्यात आली.
केरी तपासणी नाक्यावर कडक नजर हवी
गेल्या चार महिन्यांपासून बेकायदेशीर गोमांस वाहतूक करण्याच्या घटनेत चारवेळा कारवाई करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गोमांस गोव्यामध्ये येत होते. सदर गोमांस केरी तपासणी नाक्यावर पकडण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती.