‘माझी बस’ नव्याने अधिसूचित : बसमालकांसाठी आणखी सवलती
पणजी : वाहतूक खात्याने २०२३ मध्ये सुरू केलेली ‘माझी बस’ योजना पुन्हा नव्याने अधिसूचित केली आहे. नव्या योजनेत खासगी बसचालकांना पूर्वीपेक्षा अधिक सवलती आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. यानुसार बसचालकांना प्रती किलोमीटर ३ रुपये अनुदान, विमा प्रिमियममधील ५० टक्के निधी ( जास्तीत जास्त ३० हजार रुपये) तसेच नवी बस घेण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे चालकांना मिळालेल्या तिकीट विक्रीतील हिस्सा कदंबला द्यावा लागणार नाही. अधिक सवलती असल्याने नव्या योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी खात्याची अपेक्षा आहे.
खात्याने नुकत्याच अधिसूचित केलेल्या योजनेनुसार आवश्यक परवाने असलेल्या बसचालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेअंतर्गत सर्व बसमध्ये कदंब महामंडळाचे स्मार्ट ट्रान्झिट पास आणि स्मार्ट ट्रान्झिट कार्ड हे वैध भाडेपट्टा म्हणून स्वीकारले जातील. महामंडळाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या पास आणि कार्ड्सद्वारे गोळा केलेली रक्कम संबंधित ऑपरेटरना परत केली जाईल. बसचालकांना त्यांच्या बसेसवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम कदंब महामंडळ प्रशासकीय व अन्य खर्चासाठी राखून ठेवणार आहे.
योजनेत पंधरा वर्षांपेक्षा जुन्या बस चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र योजनेच्या सुरुवातीची तीन वर्षे २० वर्षांपर्यंतच्या जुन्या बससाठी परवानगी असणार आहे. अर्जदार व्यक्ती गोव्यातील नोंदणीकृत मालक असणे आवश्यक आहे. बसमालक, कंडक्टर किंवा चालक वाहन लॉग बुक राखण्याची जबाबदारी घेईल. त्यांनी प्रत्येक ट्रिपच्या माहिती नोंद करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रस्थान आणि आगमनाची वेळ, अंतर आणि देखभालीच्या आवश्यकतांचा समावेश असेल. योजनेतील बसना फिटनेस प्रमाणपत्र तसेच सर्वसमावेशक विमा उतरवला असणे गरजेचे आहे.
दुरुस्ती, देखभालीसाठी दाेन दिवस
महिन्यातील दोन दिवस बसची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी राखून ठेवता येतील. हे दिवस वगळता बस वर्षभर याची जबाबदारी मालकांना घ्यावी लागणार आहे. बस नादुरुस्त झाल्यास किंवा सेवा विस्कळीत झाल्यास पर्यायी बसची व्यवस्था करावी लागेल.
महत्त्वाचे मुद्दे...
- योजनेचा कालावधी एक वर्षांचा असेल.
- योजनेतील बसची खात्याकडून वेळोवेळी तपासणी केली जाईल.
- बसना लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस बसवणे आवश्यक आहे.
- बसमधील कंडक्टरने महामंडळाने पुरवलेले ऑटोमॅटिक तिकीट मशीन वापरणे गरजेचे.