संजीव नाईक: अहवाल राज्य सरकारकडे करणार सादर
पणजी : राज्यात भंडारी समाजाच्या वतीने जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय उपेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समितीने घेतला असून, या सर्वेक्षणाची सुरुवात ३० एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. ३१ मेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, त्यानंतर याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य संजीव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष उपेंद्र गावकर, सदस्य रोहिदास नाईक आणि संजीव नाईक उपस्थित होते. संजीव नाईक यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणनेचे अधिकार केंद्र सरकारकडे असले तरी सांख्यिकी कायदा २००८ नुसार राज्य सरकारही जातनिहाय सर्वेक्षण करू शकते. बिहार आणि कर्नाटक यांनाही अशा प्रकारचे सर्वेक्षण यापूर्वी यशस्वीरीत्या केले
आहे. भंडारी समाजाने सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, मात्र त्याआधी समाजाच्या अंतर्गत खासगी स्वरूपातच हा सर्वेक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजाच्या हितासाठी महत्त्वाचे पाऊल
२०११ च्या जनगणनेनुसार, गोव्यात भंडारी समाजाचे प्रमाण २६.२६ टक्के होते. सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले असल्याचा अंदाज असून, सर्वेक्षणानंतर अचूक माहिती उपलब्ध होईल. त्या आधारे ३० टक्के आरक्षणाची मागणी योग्य रीतीने मांडता येईल, असेही त्यांनी नमूद केले. हा सर्वेक्षण समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे समितीने सांगितले.