गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत

उल्हास फळदेसाई यांची माहिती : नफा वाढला, एनपीए घटला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:48 am
गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत

पणजी : वर्ष २०२४-२५ मध्ये गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अधिक बळकट झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेच्या आर्थिक उलाढालीत व निव्वळ नफ्यात वाढ, तर एनपीएमध्ये घट झाली आहे. यावर्षी बँकेची एकूण आर्थिक उलाढाल ३६०७ कोटी रुपये झाली असून, १०.९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, बँकेने सरकारला १.७३ कोटी रुपयांचा लाभांशही दिला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी दिली.
पणजी येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई यांनी ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर आणि इतर संचालकही उपस्थित होते.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेचे एनपीए ४.१३ टक्क्यांपर्यंत कमी झाले. मार्चमध्ये हा आकडा ४.१७ टक्के होता. बँकेची आर्थिक उलाढाल मागील वर्षीच्या ३,४८४ कोटी रुपयांवरून ३,६०७ कोटी रुपयांवर पोहोचली. बँकेचा निव्वळ नफा या वर्षी १०.९७ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी ४.८२ कोटी रुपये होता, असे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी बँक ठेवी २,३५९ कोटी रुपये होत्या आणि या वर्षी त्या वाढून २,४०५ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. बँकेचा सार्वजनिक कव्हर रेशो (पीसीआर) ३ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी पीसीआर ४६.८४ टक्के होता आणि यावर्षी तो ४४.०९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. बँकेची निव्वळ संपत्ती गेल्या वर्षीच्या १२८ कोटी रुपयांवरून यावर्षी १४६ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.
व्यवसायवृद्धीसाठी नवीन दिशा
एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून, बँकेने सीजीटीएमएसई संस्थेची मान्यता मिळवली आहे. या अंतर्गत १.८० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. फक्त पारंपरिक कृषी किंवा सहकारी क्षेत्रावर अवलंबून न राहता, बँकेचा व्यवसाय विविध क्षेत्रांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिजिटायझेशनकडे पाऊल
उल्हास फळदेसाई यांनी सांगितले की, बँकेचे डिजिटायझेशन हे आमचे मुख्य ध्येय आहे. आम्ही बँकेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करून सर्व सहकारी संस्थांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले आहे. तसेच क्रेडिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटी सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ‘बँक मित्र’ या उपक्रमांतर्गत गावोगावी मिनी एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्या उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी दोन मोबाइल एटीएम सुरू आहेत.