२५ हजार चौरस मीटर जागा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नियोजित ‘प्रशासन स्तंभ’ इमारतीसाठी चिंबल येथील २५ हजार चौरस मीटर जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी ‘प्रशासन स्तंभ’ नावाची राज्यातील सर्वांत मोठी इमारत बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ही इमारत सुरुवातीला पाटो-पणजी येथे उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ती पर्वरीत उभारण्याबाबत विचार सुरू झाला होता; परंतु आता ही इमारत चिंबल येथे बांधण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी चिंबलमधील २५ हजार चौरस मीटर जमीन माहिती-तंत्रज्ञान खात्याला देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
चिंबलमधीलच ६,२५० चौरस मीटर जमीन पर्यटन साधनसुविधांसाठी पर्यटन खात्याला देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याशिवाय पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याची कुर्टी येथील ६० हजार चौरस मीटर आणि कृषी खात्याची कोडार येथील एक लाख चौरस मीटर मिळून १.६० लाख चौरस मीटर जमीन पशुपालन आणि पशुसंवर्धन विज्ञान महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
टर्शरी कॅन्सर सेंटरसाठी ३१० कोटी
बांबोळी येथे टर्शरी कॅन्सर सेंटर उभारण्याचा निर्णय सरकारने गतवर्षी घेतला होता. त्यानुसार या सेंटरसाठी ३१० कोटी रुपये देण्यासही मंत्रिमंडळाने बुधवारच्या बैठकीत मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.