गुन्हेवार्ता : ईडीची गोव्यासह दिल्ली, नोएडातील ९ ठिकाणी धाड

३० लाख रुपये जप्त; पीएमएलए अंतर्गत कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th April 2025, 01:08 pm
गुन्हेवार्ता : ईडीची गोव्यासह दिल्ली, नोएडातील ९ ठिकाणी धाड

पणजी : अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लखनौ विभागाच्या पथकाने १० एप्रिल २०२५ रोजी दिल्ली, नोएडा आणि गोवा येथील ९ ठिकाणी छापे टाकले.  ही कारवाई भासिन इन्फोटेक अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., ग्रँड विनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रा. लि. आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या ठिकाणी करण्यात आली. ईडीने ही छापेमारी गौतम बुद्ध नगर (नोएडा, उत्तर प्रदेश) येथील पोलीस स्थानकात भादंसंच्या विविध कलमांतर्गत दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे सुरू केली होती.

नेमके प्रकरण काय ? 

या प्रकरणाचा प्रमुख आरोपी सतिंदर सिंग भासिन हा भासिन  इन्फोटेक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्रँड विनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स नावाने एक रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला होता. प्रकल्पाची खोटी जाहिरात आणि बनावट आश्वासने देऊन गुंतवणूकदारांना फसवण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना मालमत्तेचा ताबा देण्यात आला नाही. 

ईडीचा तपास आणि पीएमएलए अंतर्गत कारवाई 

१० एप्रिल रोजी दक्षिण गोव्यात केलेल्या धडक छापेमारीत ईडीने ३० लाख रुपयांची रोख रक्कम, विविध बँक लॉकरच्या चाव्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच काही बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा