मंत्री विश्वजीत राणे यांची आमदारांना ग्वाही
पणजी : अंगणवाड्या उभारण्यासाठी आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील सरकारी जागा निश्चित कराव्यात. तेथे अंगणवाड्या उभारल्या जातील. सध्या राज्य साधनसुविधा महामंडळाकडून (जीएसआयडीसी) १८ अंगणवाड्या बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी भाड्याच्या घरांमध्ये सुरू असलेल्या अंगणवाड्या, तेथील असुविधा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे तेथे सरकारला साधनसुविधा उभारता येत नाहीत. आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतील सरकारी जागा अंगणवाड्यांसाठी निश्चित करून द्याव्यात, तेथे अंगणवाड्या उभारण्याची आपली तयारी आहे, असे मंत्री राणे म्हणाले.
दरम्यान, अंगणवाड्यांतील सेविका, मदतनीसांना तुटपुंजे मानधन देण्यात येत आहे. सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी आमदार शेट यांच्यासह विजय सरदेसाई आणि व्हेंझी व्हिएगस यांनीही केली. त्यावर अंगणवाडी कार्यक्रम अंमलबजावणीसंदर्भात ३ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महिला आणि बाल विकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढवण्याची विनंती केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘नंद घर’च्या धर्तीवर क्लस्टर स्थापण्याचा विचार
गोव्यात अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी राजस्थानमधील नंद घरच्या धर्तीवर राज्य सरकार ‘सीएसआर’द्वारे क्लस्टर-आधारित सुविधांचा विचार करीत असल्याची माहितीही मंत्री राणे यांनी दिली.