मंत्री विश्वजीत राणेंचा विरोधी पक्षनेत्यांना टोमणा
पणजी : पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल. किंवा सरकार घडवण्यासाठी तुम्हीच या, असा टोमणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना मारला.
राज्य विधानसभेचे तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. सोमवारच्या सकाळच्या प्रश्नोत्तराच्या तासाला युरी आलेमाव यांनी दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ तसेच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळांत रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक त्या साधन सुविधा नाहीत. पुरेसे डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांना या तीन इस्पितळांमधून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणावे लागत असल्याचे युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.
त्यावर बोलताना आक्रमक झालेल्या मंत्री राणे यांनी युरी आलेमाव यांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. युरी आलेमाव प्रत्येकवेळी आपण सत्तेत आल्यानंतर सर्व काही ठीक करू, असे सांगत आहेत. परंतु, आम्ही इतक्यात जाणार नाही. सध्याच्या सरकारमधील अर्धे लोक तुमचेच आहेत. पुढील सरकारही आम्हीच घडवू असे म्हणत, सरकार घडवण्यासाठी तुम्हीही आमच्यासोबत या, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मंत्री राणे यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.