रेल्वे प्रकल्पांच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांचे समर्पक उत्तर
पणजी : राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सोमवार, २४ मार्च रोजी सुरुवात झाली. दरम्यान आज विधानसभेत आमदार विरेश बोरकर यांनी नव्या नेवरा रेल्वे स्थानकाचा मुद्दा उठवला. यावेळी रेल्वे प्रकल्पांच्या मुद्यावरून मंत्री मॉविन गुदिन्हो आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर आमनेसामने आले. करमळी रेल्वे स्थानकावर किती गाड्या येतात, येथील स्थानकाचा फुटफॉल किती ? याचे समर्पक उत्तर मंत्र्यांनी द्यावे असे आमदार बोरकर म्हणाले.
तर, या प्रश्नाचे उत्तर कोकण रेल्वेचे अधिकारी देऊ शकतील. आणि 'उद्या गाडी उशिरा आल्यास, गाडी का लेट झाली म्हणून मला प्रश्न विचारणार ?' असे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी म्हटले. दरम्यान यात मुख्यमंत्र्यांनी मोर्चा संभाळत आमदार बोरकरांना उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी :
राज्याच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पेडणे ते काणकोणपर्यंत जलद रेल्वे सुरू होणे आवश्यक असून त्यासाठीच नेवरात क्रॉसिंग स्थानक येणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले. दरम्यान, करमळी रेल्वे स्थानकावर अधिकाधिक रेल्वे थांबाव्या यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. असे झाल्यास गोव्यात येणार्या पर्यटकांना पणजीत येणे अजून सोपे होईल. तसेच त्याचा फायदा टॅक्सी व्यावसायिकांनाही होईल. नेवरात क्रॉसिंग रेल्वे स्थानक येणार असल्याने त्याचा फायदा संपूर्ण गोव्याला होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातमी अपडेट होत आहे.