२०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकेल : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
मुंबई : गेल्या १० वर्षांत भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. २०१५ मध्ये हाच आकडा २.१ ट्रिलियन डॉलर्स होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
भारताचा जीडीपी २०२५ मध्ये जपान आणि २०२७ मध्ये जर्मनीपेक्षा जास्त होईल.
धोरणात्मक सुधारणा आणि मजबूत आर्थिक वाढीमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. विकासाच्या या गतीमुळे भारत २०२५ पर्यंत जपान आणि २०२७ पर्यंत जर्मनीला मागे टाकून जागतिक आर्थिक महासत्ता बनेल, असे भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, भारताच्या विवेकी धोरणांचे कौतुक करताना, आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने म्हटले आहे की देशाच्या मजबूत आर्थिक कामगिरीमुळे २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा स्वीकारण्यास मदत होऊ शकते.
देशात उच्च दर्जाच्या नोकऱ्या आणि गुंतवणूक निर्माण करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे आयएमएफ कार्यकारी मंडळाने म्हटले आहे. भारताने कामगार बाजार सुधारणा लागू करण्यावर आणि कामगार दलात महिलांचा सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे अहवालात पुढे म्हटले आहे.