२०४७ मध्ये भारत एक सर्वश्रेष्ठ, बलवान राष्ट्र होईल!

संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ : गोवा शिपयार्डमध्ये फ्रिगेटचे जलावतरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:26 am
२०४७ मध्ये भारत एक सर्वश्रेष्ठ, बलवान राष्ट्र होईल!

वास्को : आत्मनिर्भरपणामुळे भारत निर्यात करणारा देश बनला आहे. हा देश जगापुढे हात पसरणारा नव्हे, सशक्त देशांसमोर डोळ्यात डोळे घालणारा बनला आहे. विकसित भारत संकल्पामुळे २०४७ म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षात भारत एक सर्वश्रेष्ठ व शक्तीमान राष्ट्र होईल, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांनी येथे शनिवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित कार्यक्रमात केले.

गोवा शिपयार्डने बांधलेल्या दुसऱ्या फ्रिगेटच्या जलावतरण सोहळ्यात संजय शेठ बोलत होते. ‘तवास्य’ असे नामकरण करण्यात आलेल्या या फ्रिगेटचे जलावतरण नीता शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मीलन पवार व राजेंद्र केरकर यांनी ईशस्तवन गायले. याप्रसंगी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, पश्र्चिम नौदलाचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय जसजीत सिंह, व्हाईस अॅडमिरल राजाराम स्वामीनाथन, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कृष्णा साळकर तसेच नौदल अधिकारी, गोवा शिपयार्डचे अधिकारी व कामगार उपस्थित होते.

‘आत्मनिर्भर भारत उपक्रम’ अंतर्गत या जहाजामध्ये ५६ टक्के स्वदेशी मालाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सुमारे चार हजार कोटींचा व्यवसाय मिळाला आहे. नौदल व गोवा शिपयार्ड सतत आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आज दुसऱ्या फ्रिगेटचे जलावतरण होत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हे फ्रिगेट नौदलासाठी २५ ते ३० वर्षे योगदान देईल. भारतीय नौदलाने जगातील इतर देशांच्या सशक्त नौदलांसमोर स्थान निर्माण केले आहे. आत्मनिर्भरमळे अर्थव्यवस्था सदृढ होते, व्यवसायांना ऊर्जा मिळते, असे मंत्री संजय शेठ यांनी सांगितले.

येणाऱ्या पाच वर्षांत ६० युद्धनौका विविध ठिकाणी बांधण्यात येत आहेत. त्यापैकी नऊ गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत. त्यामुळे जहाज आयात करण्याचे दिवस संपले असून आता देश निर्यात करू लागला आहे. यासाठी २०२९ पर्यंत संरक्षण निर्यातीसाठी ५० हजार कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. युद्धनौका निर्यातीत जागतिक पातळीवर उदयास येण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचेचीही मंत्री शेठ यांनी पुष्टी केली.

गोवा शिपयार्डची ४०० पटीने व्यवसाय वाढ

‘तवस्य’चे जलावतरण हे स्वदेशी युद्धनौका बांधणीतील उत्कृष्टतेचा आमच्या अथक प्रयत्नांचा कळस आहे. गोवा शिपयार्डमधील प्रकल्प हा आमच्या क्षमतेची पृष्टी करतो. गोवा शिपयार्डने गेल्या वर्षभरात सात जहाजांचे जलावतरण केले. हा प्रकल्प फक्त नौदलाच्या परिचालन क्षमतांनाच बळकट करत नाही तर, देशांतर्गत उद्योगाला चालना देतो. गोवा शिपयार्डची ४०० पटीने व्यवसाय वाढ झाली असल्याचे ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा