मडगाव बलात्कार प्रकरणात संवेदनशीलतेची होती गरज

गोव्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, कोंब मडगाव येथील बलात्कार प्रकरणातील संशयास्पद भूमिकेमुळे प्रशासनाची असंवेदनशीलता उघड झाली आहे. या गंभीर घटनेची सखोल चौकशी आणि पीडितेला न्याय मिळणे आवश्यक आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
23rd March, 03:43 am
मडगाव बलात्कार प्रकरणात संवेदनशीलतेची होती गरज

गोव्यात महिला विरोधात होणाऱ्या छळात वाढ होताना दिसून येत आहे. दर दोन-दोन आठवड्यांनी एकदा वा दोनदा महिलांवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर येत आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत सरकारने संवदेनशील होऊन हा विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. 

कोंब मडगाव येथे एका २५ वर्षीय महिलेवर झालेला बलात्काराची घटना धक्कादायक तशीच अवाक करून सोडणारी आहे. आधी ह्या महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा दावा केला आणि नंतर आपल्यावर बलात्कार झालाच नाही, नशेत मी काही बडबडत होते अशी साक्ष पीडित महिलेने दिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पीडित महिला खरं सांगते की तिच्यावर कसला दबाव टाकण्यात येत आहे का? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कोंब येथील एका वयोवृध्द जोडप्याची काळजी आणि सेवा करण्याकरता ही महिला कर्नाटकमधून आली होती आणि मडगावात आल्यावर दुसऱ्याच दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजते. ही महिला रात्रीच्या वेळेस रस्त्यावर रडत असताना स्थानिक महिला वकील शिंक्रे यांच्या निदर्शनास आले आणि पीडितेची विचारपूस केल्यावर तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. शिंक्रे यांनी त्या महिलेस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारा विरोधात गुन्हा नोंद केला. पण दोन दिवसांत पूर्ण प्रकरण पालटले. 

बायलांचो साद या एनजीओची अध्यक्ष आवदा व्हिएगस यांच्या उपस्थितीत पत्रकारांना पीडित महिलेने आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितले. आपल्याला मुलांची आठवण येत असल्यामुळे तिने पाणी पिऊन तंबाखू गिळला आणि त्या नशेत ती काही बडबडायला लागली, अशी साक्ष पीडितेने दिली. नंतर आम आदमी पक्षाचे वेन्झी व्हिएगस व शिंक्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचे सांगून या प्रकरणात गुंतलेल्यांची नावे उघड केली. 

आता हा एकंदर प्रकार बघितल्यास ह्या पीडित महिलेच्या प्रकरणात कुठलीच संवदेनशीलता दिसून आली नाही. जी साक्ष पीडित महिलेने दिली त्यावर विश्वास करणे कठीण होते आणि शिंक्रे यांनी दुसरी बाजू मांडून सगळ्यांना आश्चर्यचकीत करून अनेकांच्या मनात कोडे निर्माण केले आहे. जेव्हा ही बलात्काराची घटना घडली सगळ्यात आधी आवदा व्हिएगस यांनी संवेदनशीलता बाळगायला हवी होती. फक्त वरचे वर एकून घेण्याऐवजी तिची वैद्यकीय तपासणी करायला भाग पाडायचे होते. तसेच तिने विधान का बदलले, तिच्यावर दबाव टाकण्यात आला का, तिला जिवंत मारण्याची धमकी दिली आहे का ह्या संबंधात तिचे समुपदेशन करायला हवे होते. तसेच गोवा महिला हक्क आयोगाने त्वरित याची दखल घेऊन हे प्रकरण तपासाच्या मार्गाने पुढे आणण्याची गरज होती. तसेच महिलेची वैद्यकीय तपास करून, ज्या जाग्यावर ती महिला रस्त्यावर रडत फिरत होती, ती कोणाच्या घरातून बाहेर पडली होती हे सीसीटीव्ही पाहून निष्कर्ष काढायला हवा होता. पण दुर्दैवाची बाब म्हणजे कोणीच ह्या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली नाही. 

जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार होतो कायद्यानुसार तिची २४ तासांत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. पण तसे झाले नाही आणि महिलेनेच तपासणी करण्यास नकार दिल्याचे सांगून हे प्रकरण मिटवले. पण आमदार वेन्झी व्हिएगस यांनी हा विषय लावून धरल्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तिची वैद्यकीय चाचणी करण्याचे ठरवले पण ते तीन दिवसानंतर आणि एवढ्या उशिरा चाचणीला कसलाच अर्थ नाही. 

या प्रकरणात वजनदार इसम गुंतला असल्याची चर्चा आहे आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी ह्या इसमाने प्रचंड दबावतंत्र वापरल्याचे समजते. ही पीडित महिला केअरटेकर म्हणून कामाला लावणाऱ्या कंत्राटदाराला मानव तस्करीच्या आरोपाखाली दलाल ठरवून अटक केली आहे. दलाल फक्त महिलेच्या लैंगिक शोषणाच्या 

अनुषंगाने तस्करी करतात त्यामुळे लैंगिक कारणांसाठी ह्याने पीडितेला मडगावमध्ये आणले असेल ही शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे पोलिसांनी ह्या अनुषंगाने पुढील तपास करावा, प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचावे. आमदार वेन्झी व्हिएगस हे प्रकरणात सखोल जाऊन पीडितेला न्याय देणाचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आम्ही कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता वेन्झी यांना पाठिंबा दिला पाहिजे.


समीप नार्वेकर 
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)