बेतूल येथील स्फोट दुर्घटनेनंतर दुसरे गोदाम सील
मडगाव : वेर्णा येथील ह्युज प्रेसिझन मॅन्युफॅक्टरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बेतूल नाकेरी येथील स्फोटकांच्या गोदामाला आग लागली होती. पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेकडून (पेसा) परवाना तात्पुरता निलंबित केलेला होता व शनिवारी या संघटनेच्या अधिकार्यांकडून दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांसह घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
यासंदर्भातील अहवाल केंद्रातील वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. तसेच त्या ठिकाणच्या दुसर्या गोदामाला परवानगी घेतलेली नसल्याने सदर स्फोटके असलेले गोदाम सध्या सील करण्यात आले आहे.
वेर्णा येथील ह्युज प्रेसिझन मॅगझिन या कंपनीच्या बेतूल नाकेरी येथील स्फोटकांच्या गोदामाला आग लागण्याची व स्फोट होण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार डिकॉस्टा यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. शुक्रवारी फॉरेन्सिकच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी केलेली होती व आगीसंदर्भात काही पुरावे गोळा केले.
जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनीही सदर घटनास्थळाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. घटनास्थळावरील दुसर्या गोदामात दारूसाठा असल्याने यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना गाडीसह तैनात केले असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तसेच आग कशामुळे लागली याचा तपास देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या आगीत एका गोदामातील सुमारे १४.५ टन दारूसाठा जळून खाक झाल्याने सुमारे सहा कोटींचे नुकसान झाले. पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेकडून आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ह्युज प्रेसिझन मॅन्युफॅक्टरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करत आदेश काढल्यापासून २१ दिवसांच्या आत परवाना रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे देण्यास सांगितलेले आहे.
कंपनीच्या कारवाईसंदर्भात लवकरच निर्णय
शनिवारी सकाळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर यांच्यासह पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेच्या अधिकार्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
पाहणीवेळी एका गोदामासाठी पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेकडून परवानगी देण्यात आलेली होती पण दुसर्या गोदामाला परवानगी नसल्याचे समोर आले. पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेकडून या पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असून त्यानंतर कंपनीच्या कारवाईसंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.