पर्यटन संचालक : किनारी भागात भटक्या कुत्र्यांविरुद्ध निर्बिजीकरण मोहीम
पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक.
पणजी : राज्यात यापुढे बेकायदा टाऊट्सना दंड ठोठावला जाणार नाही, तर या टाऊट्सना अद्दल घडविण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात कडक कायदा करून टाऊट्सना तडीपार करण्याचा विचार पर्यटन खाते करत आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे समुद्र किनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांचा चावा घेणारी भटकी कुत्री आणि टाऊट्सची वाढती दादागिरी या विषयावर पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी अखिल गोवा शॅक मालक संघटनेची बैठक घेतली. यावेळी पशुपालन खात्याचे अधिकारी आणि मिशन रेबीजचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना केदार नाईक यांनी सांगितले, शॅक मालक, किनारा संघटना आणि इतर भागधारकांनी आपल्या आस्थापनात टाऊट्सना यायला बंदी घालायला हवी. जर हे करण्यास शॅक मालक अपयशी ठरले तर पर्यटन खाते कायदेशीर यंत्रणेद्वारे या बेकायदेशीर गोष्टी बंद करणार आहे. तसेच आपल्या आस्थापनात कुठलेही बेकायदेशीर कृत्य होऊ नये याची काळजी शॅक मालकांनी घ्यायला हवी. यासारखे विषय हातळण्यासाठी पर्यटन खाते कडक नियम अमलात आणण्याचा विचार करत आहे. दक्षिण गोव्यात कोलवा आणि बाणावली, उत्तर गोव्यात ओझरात किनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.
पोलिसांना निर्देश दिले आहेत की, टाऊट्सविरुद्धच्या मोहिमेवर जोर देऊन होतील तेवढी प्रकरणे नोंद करावीत. टाऊट्सना आम्ही पर्यटन खात्यासमोर उपस्थित करून त्यांना ५ हजार ते ५० हजारांपर्यंत दंड ठोठावणार आहोत. या टाऊट्सविरुद्ध कडक शिक्षा देणारा कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक आणून कडक कायदा करून त्यांना कुठली शिक्षा देणे शक्य आहे, त्यावर आम्ही विचार करत आहोत. तरीही हे टाऊट्स पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाया करत असतील तर त्यांना तडीपार करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती केदार नाईक यांनी दिली.
टाऊट्स, भटकी कुत्री पर्यटनाच्या मुळावर : कार्दोझ
अखिल गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी सांगितले की, राज्यातील अर्धे पर्यटन टाऊट्सनी आणि २० टक्के पर्यटन भटक्या कुत्र्यांनी संपवले आहे. कळंगुट आणि कांदोळी पोलिसांनी कारवाई करून टाऊट्सची संख्या कमी केली होती, पण केळशी किनाऱ्यावर टाऊट्सच्या संख्येत वाढ झालेली असून ते पर्यटकांची वाहने रस्त्यांवर अडवतात आणि कमिशन घेण्यासाठी पर्यटकांना नको असलेल्या गोष्टींची आमिषे दाखवतात. या टाऊट्समुळे सामाजमाध्यमांवर गोव्याची बदनामी झाली आहे यामुळे पर्यटन संचालकांकडे कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.