नाव ‘सोनू’... सोन्यासारखं काम; ५ लाखांचे दागिने केले परत..!

पोलीस कॉन्स्टेबलकडून दागिन्यांची बॅग महिलेला सुपूर्द

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd March, 12:26 am
नाव ‘सोनू’... सोन्यासारखं काम; ५ लाखांचे दागिने केले परत..!

सुवर्णालंकार असलेली बॅग पोलीस निरीक्षकांकडे देताना कॉन्स्टेबल सोनू फाळे. (संतोष मिरजकर)

मडगाव :
मडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सोनू फाळे यांना कुठ्ठाळी पुलावर सापडलेल्या बॅगेत ५ लाखांचे सोन्याचे दागिने आढळून आले. चौकशीअंती ती बॅग बार्देशमधील महिलेला परत करण्यात आली. या प्रामाणिकपणाबाबत फाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सोनू फाळे हे मडगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते कामावर येत असतानाच कुठ्ठाळी पुलावर त्यांना एक बॅग दिसून आली. त्यांनी गाडी थांबवून बॅगची तपासणी केली असता, त्यात सोन्याचे दागिने असल्याचे दिसून आले. त्याने सदर बॅग आपल्यासोबत घेऊन ती मडगाव पोलीस स्थानकात आणली व पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्याकडे देत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर बॅग कोणाची आहे, याबाबत चौकशी करण्यात आली असता, सदर बॅग बार्देश तालुक्यातील एका महिलेची असल्याचे समोर आले. त्यानुसार महिलेला बोलावून घेत सुमारे पाच लाखांचे सुवर्णालंकार असलेली बॅग तिच्या स्वाधीन करण्यात आली.
या प्रामाणिकपणाबद्दल कॉन्स्टेबल सोनू फाळे यांचे अभिनंदन होत आहे.

हेही वाचा