गुन्हे शाखेने छापा मारून केली कारवाई
वास्को : झुआरीनगर येथे ऑनलाईन जुगार प्रकरणी गुन्हे शाखेने छापा टाकून एका स्थानिक एजंटासह तीनजणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लेनोवो टॅब्लेट, जिओ फायबर राऊटर व रोख रक्कम साडे अठरा हजार असा सुमारे एक लाख साडेबारा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गोवेकर यांना सदर ऑनलाईन रॅकेटसंबंधी माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई कल्पेश शिरोडकर, कमलेश धारगळकर, सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गोवेकर यांचा समावेश असलेल्या पथकाने शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला. झुआरीनगर येथील एका हॉटेलजवळच्या जागेत सदर जुगार चालत होता. तेथे छापा टाकल्यावर दोघेजण सापडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे निशांत योगेश पुजारी (३०, वेळ्ळी) व प्रशांत सदानंद शेट्टी अशी आहेत. ते मूळचे उड्डपी कर्नाटकचे आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर त्यांनी नावेली येथील नूरसाब सय्यद यांचे नाव सांगितले. नूरसाब याने त्यांना सदर बेकायदेशीर जुगारासाठी सदर जागा उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे नूरसाब हा मडगाव, वेर्णा परिसरात बेकायदेशीर ऑनलाईन बेंटिंग नेटवर्क चालविण्यासाठी एजंट म्हणूनही काम करतो. याप्रकरणी पुढील तपास संतोष गोवेकर करीत आहेत.