फातोर्डा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू नोंद
मडगाव : अंबाजी फातोर्डा येथे रहाणाऱ्या स्मिता लोटलीकर (वय ७० वर्ष) या दिवा पेटवत असताना अंगावरील कपड्यांना आग लागल्याने गंभीररित्या भाजल्याची दुर्देवी घटना ६ मार्च रोजी घडली होती.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी दिनांक ८ मार्च रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलिसांनी केलेल्या चौकशीत ७० वर्षीय स्मिता लोटलीकर या गॅस लायटरचा वापर करुन दिवा लावत असताना त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांना ही आग लागल्याची माहिती मिळाली.
या आगीमुळे त्या भाजल्या व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचाराअंती त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत पाठवण्यात आले. मात्र गोमेकॉत उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुखदा प्रभुदेसाई पुढील तपास करत आहेत.