आगामी जागतिक चीन, आशियाई स्पर्धेसाठी निवड
रौप्यपदकासह राकेश बेदी.
वास्को : भारतीय नौदलाचा धावपटू राकेश मनोज बेदीने २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ग्रीसमधील अथेन्स येथे झालेल्या अॅक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ७५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे.
सध्या गोव्यात सेवा बजावत असलेले बेदी हे एक अनुभवी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वुशु, जु-जित्सू आणि ज्युडो खेळाडू आणि प्रमाणित लेव्हल-०४ फिटनेस प्रशिक्षक आहेत. त्यांनी यापूर्वी ३७ व्या राष्ट्रीय खेळ गोवा, तसेच जागतिक अजिंक्यपद २०२४ आणि नॉर्डिक कप २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
बेदी यांची आगामी जागतिक खेळ २०२५ (चीन) आणि आशियाई अजिंक्यपद २०२५ (जॉर्डन) साठी देखील निवड झाली आहे, ज्यामुळे भारतातील अव्वल मार्शल आर्टिस्टमध्ये त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. बेदी यांनी त्यांचे कमांडिंग ऑफिसर आणि नौदलाच्या ट्युनिर जहाजाचे कार्यकारी अधिकारी, वुशू असोसिएशन ऑफ इंडिया, गोवा वुशू असोसिएशन, प्रशिक्षक किलमन पाउलो फर्नांडिस आणि अनेक मार्गदर्शक आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत.