चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पराभवानंतर घेतली तडकाफडकी निवृत्ती
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे होते. मात्र, भारताविरुद्धच्या पराभवानंतर आता त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत राहणार आहे.
२०२८ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या ऑल्मिपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहण्याची स्मिथची इच्छा आहे. तसेच, पुढील काही महिन्यात पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही स्मिथने म्हटले आहे.
स्मिथची वनडे कारकीर्द
स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून १७० एकदिवसीय सामने खेळताना ४३.३ च्या सरासरने ५८०० धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने ११६ कसोटी आणि ६७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये पदार्पण
स्मिथने २०१० साली वेस्ट इंडिजविरुद्ध लेग-स्पिन ऑलराउंडर म्हणून पदार्पण केले. मात्र, यानंतर स्मिथने पुढे जाऊन आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्याने गोलंदाज म्हणूनही २८ विकेट्स घेतल्या आहेत.
दोन वर्ल्ड कप जिंकणे सर्वोत्तम कामगिरी
निवृत्तीची घोषणा करताना स्मिथ म्हणाला, हा प्रवास खूपच सुंदर होता. मी प्रत्येक मिनिटं याचा आनंद घेतला. खूप चांगल्या आठवणीसोबत राहिल्या आहेत. दोन वर्ल्ड कप जिंकणे ही सर्वोत्तम कामगिरी होती. या प्रवासात अनेक चांगले खेळाडूंची साथ मिळाली.