ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

सलग तिसऱ्यांदा गाठली किताबी लढत : ९ मार्चला दुबईत रंगणार लढत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th March, 10:21 pm
ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

दुबई : भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत विराट कोहली आपल्या दुसऱ्या शतकापासून केवळ १६ धावांनी दूर राहिला. भारताचा आता ९ मार्च रोजी दुबईत अंतिम सामना होणार आहे.

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने हे लक्ष्य ११ चेंडू शिल्लक असताना ४ गडी गमावून गाठले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा विराट कोहलीचा होता. त्याने दबावाने भरलेल्या मधल्या षटकांमध्ये आपली भूमिका मजबूत ठेवत ८४ धावा केल्या.

दुबईमध्ये भारताने रचला इतिहास

भारतीय संघाने दुबईमध्ये चौथा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय बऱ्याच प्रमाणात चांगला ठरला. दुबईच्या मैदानावर २५० धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया हा या स्पर्धेत पहिला संघ ठरला. असे असूनही, ते २६५ धावांचे लक्ष्य राखण्यात अपयशी ठरला. दुबईच्या मैदानावर २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणारा भारत आता जगातील केवळ चौथा देश बनला आहे.

भारत खेळणार सलग तिसरा अंतिम सामना

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची हॅटट्रिक साधली आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. २०१७ मध्येही भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण यावेळी त्यांना पाकिस्तानकडून १८० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे.