चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : आयसीसीच्या बाद फेरीमध्ये किवींचेच वर्चस्व
दुबई : रविवारी (९ मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी आमनेसामने येतील.भारत अजूनही स्पर्धेत अपराजित आहे. पण न्यूझीलंडचा स्पर्धेतला एकमेव पराभव रोहित शर्माच्या संघाविरुद्ध गट फेरीत झाला.
आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही संघ बाद फेरीत चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी किवी संघाने ३ वेळा विजय मिळवला आहे, तर टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला, त्यानंतर २०१९ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. पण, २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत केले होते.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने या चारही सामन्यांमध्ये (तीन लीग सामने आणि एक उपांत्य फेरी) नेत्रदीपक विजय मिळवला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याशिवाय, न्यूझीलंड संघाला साखळी सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने ६१ सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. याशिवाय, ७ सामने अनिर्णीत राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे बरेच सामने पावसामुळे वाया गेले आहेत आणि त्याचा फटका ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानला बसला आहे. २००२ मध्येही भारत-श्रीलंका यांच्यातली फायनल रद्द झाली होती आणि त्यामुळे दोघांनाही संयुक्त जेतेपद दिले गेले होते. याहीवेळेस अशी परिस्थिती उद्भवल्यास दोघांनाही संयुक्त विजेता म्हणून जाहीर केले जाईल.
भारत-न्यूझीलंड महामुकाबला सामना हा याआधी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरच खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने याआधीचे ४ सामने या स्टेडियममधील वेगवेगळ्या पिचवर खेळले होते. या चारही खेळपट्टींवर फिरकी गोलंदाजांना मदत झाली होती. तसेच ४ पैकी एका खेळपट्टीकडून फलंदाजांनाही मदत झाली होती. याच खेळपट्टीवर हा अंतिम सामना होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना ज्या खेळपट्टीवर झाला त्याच पीचवर हा महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना झाला होता. भारताने हा सामना ४ विकेट्सने जिंकला होता. विराटने या सामन्यात शतकी खेळी करत टीम इंडियाला विजयी केले होते. त्यामुळेच जर अंतिम सामना हा त्याच खेळपट्टीवर झाला तर विराटसाठी ही निश्चित आनंदाची बातमी ठरेल.
वरुण चक्रवर्तीचा घेतला धसका
आपल्या जादुई फिरकीने भल्याभल्या फलंदाजांची विकेट काढणारा, तसेच खेळपट्टी फिरकीला पोषक नसतानाही प्रभावी ठरणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा धसका न्यूझीलंड संघानेही घेतला आहे. रविवारी रंगणाऱ्या भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीआधी न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी तशी भावना व्यक्त केली. ‘अंतिम फेरीत सर्वांत मोठा धोका हा वरुण चक्रवर्तीच असेल’, असे सूचक विधान स्टीड यांनी केले आहे. वरूणच्या फिरकीचा सामना करताना दूरदृष्टी ठेवावी, असा सल्ला स्टीड यांनी न्यूझीलंड संघाला दिला आहे. ‘आमच्याविरुद्धच्या गट लढतीत वरुणने ४२ धावांत निम्मा संघ गारद केला होता. त्यामुळे रविवारी अंतिम फेरीतही भारतीय संघ वरुणला घेऊन खेळणार हे निश्चित’, असे स्टीड यांनी सांगितले. वरुणला निष्प्रभ करत आणि त्याच्या माऱ्यावर अधिकाधिक धावा कशा करण्याचा अभ्यास न्यूझीलंड करत आहे. यासाठी ते भारताविरुद्धच्या गट लढतीतून धडे घेणार आहेत.
सामना टाय झाला तर...
२०१९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून चषक हिरकावल्या गेल्याची सर्वांची भावना आहे. निर्धारित ५०-५० षटकांत आणि सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड-इंग्लंड लढत बरोबरीत सुटली होती. त्यामुळे इंग्लंडला चौकार जास्त असल्यामुळे विजेता घोषित केले गेले. त्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला आणि जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे फायनल टाय झाल्यास भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता ठरत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.
गोल्डन बॉलच्या शर्यतीत दोन भारतीय
गोल्डन बॉलच्या शर्यतीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री पहिल्या स्थानावर आहे. हेन्रीने आतापर्यंत १० विकेट्स घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात अधिक विकेट्स घेऊन गोल्डन बॉल जिंकण्याचा मानस असेल. पण अंतिम सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण त्याला दुखापत झाली असून खेळण्याबाबत साशंकता आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेन्रीने एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद शमीही गोल्डन बॉल जिंकण्याच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. हेन्रीला मागे टाकण्यासाठी आणखी ३ विकेट्स घ्यायच्या आहेत. शमीने तीनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्यास तो अव्वल स्थानावर असेल. शमीने बांगलादेशविरुद्ध पाच आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या आहेत.
तिसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आहे. वरुणने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. परंतु त्याने ७ विकेट्स घेत या शर्यतीत उतरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५ विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन विकेट्सही घेतल्या आहेत. चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आहे. त्याने आतापर्यंत ७ विकेट्स घेतल्या आहेत. गोल्डन बॉल जिंकण्यासाठी सँटनरला शमी आणि हेन्रीला मागे टाकण्यासाठी पाचपेक्षा जास्त विकेट्स घ्याव्या लागतील.
गोल्डन बॅटच्या शर्यतीत विराट, श्रेयस
सध्या गोल्डन बॅट जिंकण्याच्या शर्यतीत इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट हा नंबर १ वर आहे. डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ३ सामन्यात २२७ धावा केल्या आहे. मात्र इंग्लंडला स्पर्धेतून सेमी फायनलपूर्वीच बाहेर व्हावे लागले. आता भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंकडे एक अजून संधी आहे की ते गोल्डन बॅटच्या शर्यतीत बेन डकेटला मागे सोडू शकतात.
गोल्डन बॅटच्या शर्यतीत इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट पासून न्यूझीलंडचा फलंदाज राचिन रविंद्र हा केवळ एक धाव दूर आहे. रचिन रवींद्र याने ३ सामन्यात २२६ धावा बनवल्या आहेत.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने ४ सामन्यात २१७ धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यर सुद्धा गोल्डन बॅटच्या शर्यतीत असून त्याने ४ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. केन विल्यम्सनने आणि टॉम लेथम हे दोघे सुद्धा गोल्डन बॅटच्या शर्यतीत सर्वांना मागे सोडू शकतात. लेथम आणि विल्यम्सनने १९१ आणि १८९ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ :मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.