बॉडी शेमिंगचा ठपका ठेवत क्रिकेट चाहत्यांनी सोशल मिडियाद्वारे उडवली टीकेची झोड. लोक म्हणाले 'नसत्या ऊचापती का बरं सुचतात तुम्हाला ?'. भाजप म्हणाली 'स्वतच्या नेतृत्वाकडेही एकवार बघावे !'
नवी दिल्ली : समाजिक समस्या, प्रशासनातील दोष, आपली मते आणि विचार मांडण्यासाठी लोक मुक्तहस्ते सोशल मीडियाचा वापर करतात. अनेकजण विविध विषयांवर कंटेंट पोस्ट करून आपला प्रभाव समाजावर पाडण्याचा देखील प्रयत्न करताना आढळून येतात. बऱ्याचदा 'मी एक्स्पर्ट आहे, मला सगळे काही कळते, या आविर्भावात अनावश्यक आणि आपला प्रांत नसलेल्या गोष्टींवर मते मांडून फसतात देखील. पु. ल. देशपांड्यांच्या शैलीत सांगायचे झाल्यास ' आपल्याला अक्कल किती ? आपली लायकी काय ? आपला अभ्यास कसला ? यापैकी कशाचाच विचार न करता जे तोंडाला येईल ते बरळून मोकळे व्हायचे !'
सध्या सोशल मिडियावर वाचाळवीरांची मंदियाळीच जमा झाली आहे. यात आता काँग्रेस महिला प्रवक्त्यांची भर पडली आहे. कालच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद हिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ' एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा खूपच जाड आहे. त्याने वजन कमी केले पाहिजे. रोहित आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे' असे आपल्या ट्विटमध्ये शमा म्हणाली.
पहा ट्विट
सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कपिल देव आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या तुलनेत रोहित शर्मामध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे? तो एक सरासरी खेळाडू आणि सुमार दर्जाचं कर्णधार आहे, त्याला केवळ योगायोगानेच भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले आहे, असे म्हणत तिने रोहित शर्माची तुलना माजी भारतीय क्रिकेट दिग्गजांशी केली.
मग काय ? 'शमा'च्या ट्विटमुळे अवघ्या काही सेकंदातच सोशल मिडियावर वणवा पेटला. किबोर्ड वॉरियर्स, ट्रोलर्स-मीमर्स आणि क्रिकेट चाहत्यांनी आपल्या भात्यात तिखट-खोचक शब्दांचे बाण भरले आणि शमाची 'लंका' पेटवायला तिच्या कमेंट सेक्शनकडे रवाना झाले. लोकांनी अनेक मजेशीर आणि कल्पक ट्विटस केले. शमाच्या ट्विट सोबत ते देखील व्हायरल होत आहे. @rubindoddamani_23 म्हणतो -' काय म्हणून हे ट्विट केले या बाईने ? पुरुषांनी महिलांचा सन्मान केला जावा ही अपेक्षा करताय, तर महिलांनी देखील या गोष्टींची कदर करावी ना ?'. @pablo_chocobar लिहतो- 'निरर्थक रोहित नाही तुम्ही आहात. त्याने आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली. त्याचे स्टॅट्स अप्रतिम आहेत. रोहितने तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. तुमच्या पक्षाने तर गेल्या १०-१२ वर्षांत शंभरी देखील गाठलेली नाही ! @hitman45_fan200sh म्हणतो - 'काय म्हणून सुचली तुम्हाला ही अवदसा ?' @vada_wow264 लिहितो 'जानी ! जिनके घर खुद शिशे के होते है, वोह दुसरोंके घरोंपर पत्थर फेका नही करते.'
वणवा पसरला तसा भाजपच्या हँडलवरुन देखील तूफान फटकेबाजी करण्यात आली. काँग्रेस प्रवक्त्यांच्या या विधानांवर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले. 'राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ९० निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या कर्णधारपदाला निरुपयोगी म्हणत आहेत.' असे ते म्हणाले. पूनावाला यांनी रोहितच्या ट्रॅक रेकॉर्डचे कौतुक केले आणि त्याच्या टी-२० विश्वचषक विजयाचा उल्लेख केला. दरम्यान मागेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्या राधिका खेरा यांनी आरोप केला की काँग्रेसने अनेक दशकांपासून खेळाडूंचा अपमान केला आहे आणि आता ते एका क्रिकेट दिग्गजाची खिल्ली उडवत आहेत. तथापि, नंतर काँग्रेसने शमा यांना पोस्ट ताबडतोब डिलीट करण्यास सांगितले. यानंतर तिने दोन्ही पोस्ट डिलीट केल्या.
टीकेनंतर शमाचे स्पष्टीकरण
'मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केले नाही. त्या ट्विटमध्ये मी म्हटले होते की एक खेळाडू असल्याने त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाहीये.' अशी सारवासारव शमाने केली. यावर @kabir_mullaa याने - 'मोहतरमा ! बूंद से गई वोह हौद से ना आयेगी, जानी तुम रहने दो तुमसे ना हो पायेगी' अशा शायरांना अंदाजात ट्विट केले.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा शानदार विजय
भारताने काल न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला आणि गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी आणि वरुण चक्रवर्तीची ५ विकेट्ससह शानदार गोलंदाजी यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत झाली. टीम इंडिया उद्या ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.