कामावर जाणाऱ्यांना फटका : पर्वरीच्या बाजूने वाहनांच्या रांगा
पर्वरी : जुन्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवार दि. ८ फेब्रुवारीपासून १५ दिवसांसाठी जुना मांडवी पूल सर्व वाहनांसाठी बंद केल्याने नवीन मांडवी पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. पर्वरीच्या बाजूने पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळी व संध्याकाळी दिसून आले. वाहतूक पोलिसांना ही कोंडी नियंत्रित करणे शक्य न झाल्याचे दिसून आले.
शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांत जास्त बसला. ही वाहतूक कोंडी सुरूच असून पर्वरीहून पणजीला पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागत आहेत.
वाहतूक पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. ८ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवसांसाठी जुन्या मांडवी पुलाचे दुरुस्तीचे काम, डांबरीकरण, सुरक्षा उपाययोजना आणि रंगकाम करण्याचे काम पीडब्ल्यूडीने हाती घेतले आहे. यासाठी पर्वरीहून फोंडा, बांबोळी आणि दक्षिण गोव्याकडे जाणाऱ्या तसेच विरुद्ध मार्गाने येणाऱ्या दुचाकींसह सर्व वाहनचालकांना नव्या मांडवी पुलाचा पर्याय उरला आहे.
चारचाकी व अन्य वाहने अटल सेतूवरून न्यावीत, अशी सूचना करण्यात आली होती. या मार्गावर वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की, नवीन मांडवी पुलावरून संपूर्ण वाहतुकीचा भार सहन करणे शक्य नाही.
मात्र अटल सेतूवरून दुचाकी नेणे शक्य नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी बेती-पणजी मार्गावर अधिक फेरीबोटी सुरू करण्याची विनंती वाहतूक विभागाकडून करण्याचा विचार केला जात आहे.
दुरुस्तीसाठी चुकीची वेळ..!
बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले की, जुन्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीसाठी पीडब्ल्यूडीने चुकीच्या वेळेची निवड केली आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आधीच तणावाखाली असतात आणि या वाहतूक कोंडीमुळे त्यांचा ताण आणखी वाढतो.
लवकर घराबाहेर पडल्याने त्यांचा ताण कमी होणार नाही. जर नवीन मांडवी पुलावर एखादा अपघात झाला, तर विद्यार्थ्यांचे काय होईल? विद्यार्थी वेळेवर परीक्षा हॉलमध्ये पोहोचले नाहीत तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल या पालकाने केला.