रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सलग दुसरा विजय

दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी २२ चेंडू राखून पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th February, 12:36 am
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सलग दुसरा विजय

वडोदरा : महिला प्रिमिअर लागमधील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. बंगळूरूने हा सामना आठ गडी आणि २२ चेंडू राखून जिंकला.
नाणेफेक गमावल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीसाठी आले आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त एका धावेच्या धावसंख्येवर पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाली. यानंतर, कर्णधार मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी मिळून डावाची जबाबदारी घेतली. दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत फक्त १४१ धावा करून सर्वबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून जेमिमा रॉड्रिग्जने ३४ धावांची तुफानी खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, जेमिमा रॉड्रिग्जने २२ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारले. जेमिमा रॉड्रिग्ज व्यतिरिक्त सारा ब्राइसने २३ धावा केल्या.
दुसरीकडे, स्टार गोलंदाज रेणुका ठाकूर सिंगने आरसीबी संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आरसीबीकडून रेणुका ठाकूर सिंग आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. रेणुका ठाकूर सिंग आणि जॉर्जिया वेअरहॅम व्यतिरिक्त किम गार्थ आणि एकता बिश्त यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या संघाने चांगली सुरुवात केली. कर्णधार स्मृती मनधाना आणि डॅनिएल व्याट-हॉज यांनी पहिल्या गड्यासाठी १०७ धावांची भागिदारी रचली. डॅनिएल व्याट-हॉजने ३३ चेंडूत ४२ धावा केल्या. यामध्ये तिने ७ चौकार मारले. कर्णधार स्मृती मनधानाने चौफेर फटकेबाजी करत ४७ चेंडूत ८१ धावा केल्या. यामध्ये तिने १० चौकार आणि ३ षटकार खेचले. संघाला जिंकण्यासाठी केवळ १३ धावांची आवश्यकता असताना स्मृती अरुंधती रेड्डीची शिकार ठरली. तिचा झेल जेमिमा रॉड्रिग्जने घेतला. इलिसा पेरी आणि रिचा घोषने संघाला विजयापर्यंत नेले. पेरीने १३ चेंडूत नाबाद ७ तर रिचाने ५ चेंडूत ११ धावा केल्या यामध्ये तिने १ चौकार आणि १ षटकार खेचला. आरसीबीने हा सामना १६.२ षटकांत ८ गडी आणि २२ चेंडू राखून जिंकला.
स्मृती मानधनाचे तुफानी अर्धशतक
१४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरुवात केली. स्मृती मानधना आणि डॅनी वायट यांच्यात एक शानदार सलामी भागीदारी केली.स्मृती मानधनाने तुफानी अर्धशतक ठोकले. तिने फक्त २६ चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठला. यानंतरही, त्याने वेगवान गतीने धावा काढत राहिल्या आणि १७२.३४ च्या स्ट्राईक रेटने ४७ चेंडूत ८१ धावा केल्या. आरसीबी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
गोंधळानंतर नियम बदलले
शनिवारी (१५ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या सामन्यात रन आउटच्या वादग्रस्त निर्णयामुळे गोंधळ उडाला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला. स्टंपवरील लाईट चालू असतानाही थर्ड अंपायर गायत्री वेणुगोपालन यांनी दिल्लीच्या तीन फलंदाज राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि शिखा पांडे यांना नाबाद घोषित केले होता. आतामहिला प्रीमियर लीगचे नियम आता बदलण्यात आले आहेत. पूर्वी, एलईडी बेल्स पेटवल्यावरच फलंदाजाला बाद किंवा नॉट आउट घोषित केले जात असे. पण आता हे होणार नाही. आता जोपर्यंत बेल्स स्टंपवरून पडत नाहीत तोपर्यंत फलंदाजाला धावबाद घोषित केले जाणार नाही.डीसी विरुद्ध एमआय सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये, थर्ड अंपायर गायत्री वेणुगोपालन यांनी फलंदाज क्रीजवर पोहोचण्यापूर्वी एलईडी स्टंप पेटलेले असतानाही तीन धावबाद देण्यात आले नव्हते. तिन्ही निर्णय दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने गेले. शिखा पांडेचे रनआउट अपील हे तीन घटनांपैकी पहिलेच होते.माजी भारतीय कर्णधार मिताली राजने सामन्याचे समालोचन करताना असेही म्हटले होते की अरुंधती आणि राधा यादवच्या बाबतीत निर्णय मुंबईच्या बाजूने जायला हवा होता. आरसीबीचे माजी क्रिकेट संचालक माइक हेसन यांनीही पंचांच्या निर्णयावर अविश्वास व्यक्त केला होता. चौकशीत असे दिसून आले की मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना या नियमांची माहिती नव्हती.
आजचा सामना
गुजरात जाएंट्स वि. मुंबई इंडियन्स
वेळ : सायं. ७.३० वा.
स्थळ : कोटंबी स्टेडियम, वडोदरा
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हाॅटस्टार