गोवा प्रिमिअर लिगचा लिलाव; दीपराज गावकरला सर्वाधिक बोली

६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान स्पर्धा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th February, 12:33 am
गोवा प्रिमिअर लिगचा लिलाव; दीपराज गावकरला सर्वाधिक बोली

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे ६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान गोवा प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी पार पडला.
या लिलावात गोव्याचा रणजीपटू दीपराज गावकर याला ५६ हजार पॉईंट्स, स्नेहल कवठणकरला ३७ हजार पॉईंट्स, सुयश प्रभूदेसाई ३७ हजार पॉईंट्स, दर्शन मिसाळला ३५ हजार पॉईंट्स, अझान थाेटाला ३३ हजार पॉईंट्स, कश्यप बखलेला ३२ हजार पॉईंट्स तसेच मोहित रेडकर २४ हजार पॉईंट्सने बोली लागली, अशी माहिती जीसीएचे सहसचिव रुपेश नाईक यांनी दिली.
या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. यामध्ये मानस पणजी जिमखाना, प्रायोरिटी कन्स्ट्रक्शन एमसीसी, साळगावकर स्पोर्ट्स क्लब, चौगुले स्पोर्ट्स क्लब, डेझर्ट अॅन मोअर जीनो स्पोर्ट्स क्लब आणि धेंपो स्पोर्ट्स क्लब या संघांचा समावेश आहे. स्पर्धेतील सर्व सामने पर्वरी जीसीए मैदान, पणजी जिमखाना, कांपाल, चिखली मैदान, सांगे मैदान आणि एमसीसी मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.

एकूण ४५ खेळाडूंचा लिलाव 

साेमवारी ४५ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या शिवाय प्रत्येक संघात ३ राज्याबाहेरील खेळाडू आणि १९ वर्षाखालील खेळाडूंचा संघात समावेश करण्याची मुभा संघ व्यवस्थापनाला देण्यात आलेली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड गोव्याच्या रणजी संघात करण्यात येणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.