नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधीला स्थगिती : उच्च न्यायालय, लवादाकडे होणार आज सुनावणी
म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनचा निकाल आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधीला प्रशासकीय लवादाच्या स्थगिती आदेशाविरुद्ध नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर मंगळवारी १८ रोजी सुनावणी होणार आहे.
देवस्थानचे विद्यमान सचिव अॅड. वामन पंडित व इतरांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सोमवारी या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी मंगळवारी निश्चित केली आहे.
दरम्यान, नवीन २५४ महाजनांना निवडणुकीत ऐनवेळी मतदानाचा अधिकार देण्याच्या देवालय प्रशासकाच्या निर्णयासंदर्भातील याचिकेवरून गेल्या गुरुवारी प्रशासकीय लवादाने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून देवस्थानचा निवडणूक निकाल तसेच गेल्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. तसेच पुढील सुनावणीची तारीख १८ रोजी दिली होती.
तत्पूर्वी, देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांना संबंधित प्राधिकरणाकडे याचिका दाखल करण्याची सूचना देत उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. दरम्यान, गेल्या दि. ९ रोजी श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्यावेळी दि. ७ रोजी सायंकाळी देवालये प्रशासकांनी देवस्थानच्या सचिवांनी नव्या २५४ महाजनांसह एकूण १४१६ जणांची यादी मतदानासाठी ग्राह्य धरली. त्या नव्या २५४ महाजनांना मतदानात सहभाग घेण्यास मोकळीक देणारा आदेश जारी दिला होता. त्यानंतर याच यादीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली होती.
बार्देश देवालय प्रशासकांच्या या आदेशाला अध्यक्ष भाईडकर यांनी उच्च न्यायालय तसेच प्रशासकीय लवादाकडे आव्हान दिले होते. गोवा सरकार, राज्याचे मुख्य सचिव, बार्देशचे मामलेदार व बोडगेश्वर देवस्थानचे नवनिर्वाचित पदाधिकारी असलेले अध्यक्ष अॅड. वामन पंडित, उपाध्यक्ष अमेय कोरगावकर, सचिव हरिश्चंद्र उर्फ सुशांत गावकर, सहसचिव कुणाल धारगळकर, खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर, उपखजिनदार विशांत केणी, मुखत्यार राजेंद्र पेडणेकर व उपमुखत्यार साईनाथ राऊळ यांना या याचिकेत प्रतिवादी बनवले होते.
दरम्यान, प्रशासकांच्या सूचनेवरून देवस्थानच्या अध्यक्षांनी ११६२ महाजनांची यादी सादर केली होती. तरीही प्रशासकांनी देवस्थानच्या सचिवांनी सादर केलेल्या १४१६ जणांच्या महाजन यादीला मान्यता देत निवडणूक घेतली आणि याच नवीन २५४ महाजनांच्या मदतीने एप्रिल २०२५ ते मार्च २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीची समिती निवडून आल्याचा दावा, या याचिकेत करण्यात आला होता.
नवीन महाजनांच्या नावांना काहींचा आक्षेप
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २० जानेवारी रोजी देवस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने समिती सचिवांनी देवालये प्रशासक असलेले बार्देश मामलेदार अनंत मळीक यांच्याकडे महाजन यादी सादर केली होती. यात २५४ नवीन महाजनांचा समावेश करण्यात आला होता. अनुक्रमे २३५८ प्रमाणे १४१६ जणांची ही यादी होती. तसेच ही यादी अध्यक्षांच्या मान्यतेविना प्रशासकांना सादर केली होती. हा प्रकार समजल्यावर या अतिरिक्त नवीन महाजनांच्या नावांना काही महाजनांनी आक्षेप घेत ही नावे निवडणूक प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली होती.