कर्नाटकातून १० लाखांचे दागिने जप्त; एकास अटक

वार्का हॉटेल चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याकडून ३.६० लाखांच्या मुद्देमालाची चोरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th February, 12:13 am
कर्नाटकातून १० लाखांचे दागिने जप्त; एकास अटक

मडगाव : वार्कातील हॉटेलमधील ३.६० लाखांच्या चोरीप्रकरणी संशयित कासिम फयाझ (रा. केळशी मूळ उडपी कर्नाटक) याला अटक झाली होती. चौकशीदरम्यान इतरही चोरीत त्याचा सहभाग आढळून आला. कर्नाटकातील एसएम प्रदीप याच्याकडून आता १० लाखांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत.
वार्का येथील क्लब महिंद्रा हॉटेलमध्ये २ फेब्रुवारीला अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या रुमच्या बाल्कनीचा दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला. त्याने खोलीतून ३५ ग्रॅम वजनाची क्रॉस पेंडंट असलेली चेन, १ सोन्याची रिंग व सात ग्रॅम अमेरिकन डायमंड व ३ ग्रॅमची रिंग असा ४५ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह २७०० रुपये असा सुमारे ३.६० लाखांचा मुद्देमाल चोरी केला.
दरम्यान, पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान कासिमने साकलेशपुरा कर्नाटकातील एसएम प्रदीप मूर्ती याच्याकडे दागिने असल्याचे सांगितले. त्यानुसार कोलवा पोलिसांच्या पथकाने कर्नाटकात जात एसएम प्रदीपला ताब्यात घेतले. प्रदीप याने सांगितले की, कासिम हा त्याचा मित्र असून आर्थिक अडचणीत असून पत्नीचे व मुलाचे दागिने देत त्याने आपणाकडून ८५ हजार रुपये घेतले. त्यानंतर आपण गोल्ड लोन काढून त्याला पैसे दिल्याचे सांगितले.
कोलवा पोलिसांनी एक चेन, एक नेकलेस, ४ कानातील रिंग व दोन अंगठ्या असा सुमारे १० लाखांचे दागिने जप्त केलेले आहेत. तसेच प्रदीप याला चौकशीसाठी कोलवा पोलिसांत हजर राहण्यासाठी नोटीसही जारी केलेली आहे. पेंडंट, रिंग, डायमंड व चांदीची रिंग जप्त करण्यात आली. या चोरीप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निखिल खाजणेकर पुढील तपास करत आहेत.‍
सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने संशयिताला अटक
याप्रकरणी कोलवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक अज्ञात व्यक्ती हॉटेल परिसरात फिरताना आढळून आला. ही व्यक्ती हॉटेलमधील कर्मचारी नव्हती व पर्यटकही नसल्याचे चौकशीअंती समोर आले. चोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक रितेश तारी यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करत तपास करण्यात आला व संशयित कासिम फयाज याला अटक केली होती.