सिनारींच्या घरात बेकायदा घुसखोरी प्रकरण : तिन्ही संशयितांना जामीन
म्हापसा : सेंट मायकल वाडा, हणजूण येथे बेकायदेशीररीत्या घरात घुसून फिर्यादी ब्रॉन्विन सिनारी कुटुंबियांना घरातून हाकलून लावण्याच्या प्रकरणी अटक केलेल्या तिन्ही संशयित बाऊन्सरची म्हापसा न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. तर मुख्य संशयित आरोपी जनार्दन खोराडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
सोमवारी दि. १७ रोजी संशयित आरोपी राकेश नंदकिशोर राहा (३६, रा. साखळी व मूळ उत्तरप्रदेश), परशुराम शंकर गावस (४२, रा. वाडी नादोडा, बार्देश) व विकी विजय नाईक (२०, इल्हास, जुने गोवे) या तिघांचा जामीन अर्ज सुनावणी झाली. त्यानंतर म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने तिघांचीही सशर्त जामिनावर सुटका केली.
दरम्यान, संशयित जनार्दन खोराडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी १७ रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. पोलीस व संशयितांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
हा प्रकार गेल्या शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी सोमवारी दि. १० रोजी हणजूण पोलिसांनी जनार्दन खोराटे व अज्ञात १५ ते २० जणांविरुद्ध भा.न्या.सं.च्या १८९(२), १९१(२), ३२९(४), ३३१(३), ३०५, ३५१(४) गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याखाली वरील तिघा संशयितांना अटक केली होती. गेल्या दि. १४ रोजी हे प्रकरण हणजूण पोलिसांकडून पुढील चौकशीसाठी गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी पुढील तपास गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर करीत आहेत.
किमती वस्तूंची चोरी केल्याचा फिर्यादींचा दावा
कॅनडास्थितीत मायकल पीटर या विदेशी नागरिकाच्या मालकीच्या घरात फिर्यादी ब्रॉन्विन सिनारी, पती राजेंद्र सिनारी व कुटुंबीय वास्तव्यास होते. घटनेच्यावेळी आपण मालमत्तेचा मुखत्यारपत्रधारक (पॉवर ऑफ अॅटर्नी) असल्याचा दावा करीत संशयित जनार्दन खोराडे यांनी १५ ते २० लोकांच्या सहाय्याने घरात गुन्हेगारी पद्धतीने घुसखोरी केली. त्यानंतर कुुटुंबियांना धमकावून घरातील सामान बाहेर काढले. यातील वॉशिंग मशीन, लॅपटॉप, प्रिंटर, सुटकेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू तसेच ३ लाख रुपये रक्कम अादी मुद्देमालाची चोरी केल्याचा आरोप फिर्यादींनी या तक्रारीत केला होता.