व्हिसेरा तपासणीसाठी बंगळूरूला पाठवला
जोयडा : फोंडाचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा व्हिसेरा तपासणीसाठी बंगळूरू येथील न्याय वैद्यक संस्थेकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा अहवाल आल्यानंतर मामलेदार यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून अहवाल येण्यास किमान दीड महिना लागणार आहे.
दरम्यान मामलेदार खून प्रकरणातील अमीरसोहेल उर्फ मुजाहीद शकीलसाब सनदी (२७) याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध बेळगाव मार्केट परिसरात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६(२), १५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदारांचा मृत्यू रक्तदाब कमी झाल्याने, जास्त झाल्याने की हृदयविकाराने झाला, तसेच त्यामागे अन्य काही कारण आहे का ? हे तपासण्यासाठी विश्वासार्ह पद्दत म्हणून व्हिसेरा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी त्यांच्या शरीरातून तरल पदार्थाचे नमुने व्हिसेरासाठी घेण्यात आले असून बंगळूरू येथील न्याय वैद्यक संस्थेकडे पाठवले आहेत.