पर्यटकांच्या ऑनलाईन तक्रारींवरून गोवा पोलिसांकडून गुन्हे नोंद
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : जलसफारीची ग्रॅण्ड आयलंड ट्रीप तसेच स्वस्तात हॉटेलच्या खोल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशी पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने लुबाडण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पीडित पर्यटकांच्या ऑनलाईन तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे पर्वरी आणि कळंगुट पोलिसांनी नोंदवले आहेत.
नेरूल येथील कोको बीचवरून ग्रॅण्ड आयलंड ट्रीप जलसफारी देण्याचे आमिष दाखवून पाच हजार रुपयांना लुबाडण्यात आल्याची ऑनलाईन तक्रार प्रतीक अगरवाल (जयपूर-राजस्थान) या पर्यटकाने गोवा पोलिसांकडे केली होती. या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी डायव्हिंगस्कूबा डॉट ईन नामक संकेतस्थळाच्या एजन्टवजा मालकावर गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने या संकेतस्थळावर ग्रॅण्ड आयलंड ट्रीप पॅकेजचे बनावट पत्रक अपलोड केले होते. या पॅकेजचे शुल्क ५ हजार रुपये असून त्यात ग्रॅण्ड आयलंड ट्रीप जलसफारीसह स्कूबा डायव्हिंगस, पॅरासेलिंग, बनाना स्वारी, मद्यपेय समवेत अमर्यादित भोजन, जीवरक्षक उपकरणे आणि इतर जल क्रियाकलापांचे आश्वासन दिले होते. फिर्यादींनी संकेतस्थळावरून ११ ते १४ जानेवारीपर्यंत ही ट्रीप बूक केली होती. मात्र कोको बीचवर संबंधित ट्रीप ऑपरेटरकडे आल्यावर फसवणूक झाल्याचे आढळून आले. कारण सदर ऑपरेटर या ट्रीपसाठी फक्त अकराशे रुपये शुल्क घेतो आणि वरील सुविधा देत नाही. पर्यटकाने गावी परतल्यावर गोवा पोलिसांना ऑनलाईन पद्धतीने या फसवणुकीची तक्रार पाठवली.
कांदोळी येथे सन अॅण्ड सॅण्ड अपार्टमेंट भाड्याने देण्याचे आमिष दाखवून काही संकेतस्थळवाल्यांनी उत्तमविजय कुमनार श्रीवास्तव (लखनऊ, उत्तर प्रदेश) यांना २४ डिसेंबर २०२४ रोजी फसवले. संशयिताने फेसबूक पेजवर कांदोळी येथे स्वस्तात ‘सन अॅण्ड सॅण्ड’ अपार्टमेंट भाड्याने द्यायचे असल्याचा पोस्ट टाकला होता. श्रीवास्तव यांनी सदर व्यक्तीशी संपर्क साधला व २४०० रुपये शुल्क देऊन अपार्टमेंट बूक केले. मात्र गोव्यात आल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी नंतर ऑनलाईन तक्रार देताच कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२० ते २५ पर्यटकांच्या ऑनलाईन पद्धतीने तक्रारी
राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील पर्यटकांची काही संशयितांनी संकेतस्थळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमांतून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यापैकी सुमारे २० ते २५ पर्यटकांनी गोवा पोलिसांत ऑनलाईन पद्धतीने तक्रारी नोंद केल्या आहेत. पोलीस खात्याने या तक्रारी संबंधित किनारी भागातील पोलिसांकडे वर्ग केल्या आहेत. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
संशयिताच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या
स्वस्तात अपार्टमेंट देण्याचे भासवून विजयकुमार श्रीवास्तव (लखनऊ) यांची फसवणूक करणारा संशयित दिलीपकुमार विश्वकर्मा (रा. बिदर, कर्नाटक) याला कळंगुट पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे. संशयिताला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीपकुमारने अन्य राज्यांतही अशाचप्रकारे अनेकांना लुबाडले असल्याचे पोलीस चौकशीतून उघड झाले आहे.