मोफत कॅन्सर स्क्रि​निंग अभियान; गोमंतकीयांसाठी वरदानच !

Story: अंतरंग |
16th February, 09:52 pm
मोफत कॅन्सर स्क्रि​निंग अभियान; गोमंतकीयांसाठी वरदानच !

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ), दंत महा​विद्यालय आणि आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मोफत कॅन्सर स्क्रिनिंग अभियान सुरू आहे. नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील सुमारे २५ डॉक्टरांचे पथक विविध भागांमध्ये जाऊन मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनच्या माध्यमातून स्थानिकांची तपासणी करीत आहेत. आतापर्यंत मंडूर, वाळपई, कुडचडे, साखळी, जुने गोवे, काणकोण, सांगे, डिचोली, पेडणे, शिरोडा, हळदोणे आदी तेरा ठिकाणी झालेल्या अभियानांमध्ये या पथकाने २,७८० जणांची मोफत तपासणी केली. त्यात १३ जणांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तर, ५२ जणांमध्ये कॅन्सरची लक्षणे दिसून आलेली. या सर्वांवर सध्या इस्पितळांत उपचार सुरू असल्याने त्यांचे वाचवण्यास मदत झालेली आहे.

डॉ. काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक विविध भागांमध्ये ज्या तळमळीने हे अभियान राबवून यशस्वी करून दाखवत आहे, त्याचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. त्यामुळेच आता सत्ताधारी आमदारांसह कार्लुस फेरेरा, व्हेंझी व्हिएगश यांसारखे विरोधी बाकांवरील आमदारही आपापल्या मतदारसंघांत अभियान राबवण्याची मागणी डॉ. काकोडकर यांच्याकडे करताना दिसत आहेत. कॅन्सर हा मुळात दुर्धर असा रोग. या रोगाची लागण झाल्याचे जितके लवकर समजेल, तितके रुग्णाला वाचवणे सोपे जाते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यभरात कॅन्सरची मोफत तपासणी करायचे निश्चित केले. त्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीतून मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन उपलब्ध करून दिली. सरकारने या अभियानाची संपूर्ण जबाबदारी डॉ. काकोडकर यांच्यावर सोपवल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ राज्यभरात मोफत कॅन्सर स्क्रिनिंग अभियान सुरू केले आणि विशेषत: ग्रामीण भागांतील जनतेला मोठा दिलासा मिळवून दिला.

कॅन्सर तपासणीसाठी सरकारी किंवा खासगी इस्पितळांत गेल्यानंतर अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी विविध डॉक्टरांकडे रांगा लावाव्या लागतात. तपासणीअंती कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यास उपचारांवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, गोवा सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा याेजनेच्या माध्यमातून गोमंतकीयांना कॅन्सरवरील उपचारांसाठी विमा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आधार मिळालेला आहे. परंतु, अशाप्रकारचा रुग्ण जगण्यासाठी त्याला कॅन्सरची लागण झाल्याचे प्राथमिक पातळीवरच समजून येणे गरजेचे आहे. त्यासाठीच सरकारने मोफत स्क्रिनिंग अभियान सुरू केले आहे. एकाचवेळी २५ डॉक्टरांकडून रुग्णांची एकाच ठिकाणी तपासणी होत असल्याने कॅन्सरची लागण झालेले तसेच कॅन्सर होण्याआधीच्या पायरीवर असलेले तत्काळ सापडून त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू होत आहेत. यातूनच या अभियानाचे यश दिसून येते. एकंदरीत, जीवनशैलीत झालेले बदल, वाढती व्यसनाधीनता अशा काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांत राज्यात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडत आहेत. अशा स्थितीत सरकारने मोफत स्क्रिनिंग अभियान सुरू केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचत आहेत.

- सिद्धार्थ कांबळे