विरोध - पाठिंब्याचे राजकारण

निवडणूक आयोगाच्या ऐतिहासिक निवड्यानंतर श्रीमती ताईंना मगो पक्षात परत घ्या अशी मागणी व मोहीम ताई समर्थकांनी उघडली. मगो पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. २० नोव्हेंबर १९८३ रोजी झालेल्या अधिवेशनात श्रीमती काकोडकर यांची मगो पक्षातून तहहयात हकालपट्टी करण्यात आली.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
16th February, 12:22 am
विरोध - पाठिंब्याचे राजकारण

प्रतापसिंह राणे यांची उचलबांगडी करुन गोवा मुख्यमंत्री पदावर आपली वर्णी लावण्यात यावी ही मागणी धसास लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करुन डॉ. विली डिसोझा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली तेव्हा श्रीमती गांधी बऱ्याच चिडलेल्या होत्या. आपल्याला मुख्यमंत्री करायचे नसल्यास चंद्रकांत चोडणकर किंवा विष्णू अ. नायक यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात यावी असे त्यांनी सुचविले तेव्हा श्रीमती गांधी अधिकच चिडल्या. तुम्हाला सीएम केल्यास गोव्यातील हिंदू आम्हाला मते देतील काय? हा प्रश्न ऐकून डॉ. विलींची बोलतीच बंद झाली. गोव्यातील काँग्रेसजनांनी आपला निर्णय दिलेला आहे. तो मान्य नसल्यास विधानसभा विसर्जित करुन राष्ट्रपती राजवट लागू करुया अशी तंबी देताच डॉ. विलीनी काढता पाय घेतला. डॉ. विली यांच्या जागी आणखी कोणी असता, तर काळाची पावले ओळखून राणे यांच्याबरोबर समेट घडवून आणला असता व योग्य वेळी हालचाली-कारवाया केल्या असत्या. पण डॉ. विली डिसोझा यांनी आपल्या राजकीय अपरिपक्वपणाचे दर्शन घडवत आपल्या कारवाया चालूच ठेवल्या. डॉ. विली डिसोझा यांचे उजवे हात मानले जाणारे गोवा प्रदेश इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस गोविंद पानवेलकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून मुख्यमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि प्रदेश काँग्रेस समितीची फेररचना करण्याची मागणी केली.

दयानंद नार्वेकर यांनी राणे विरोधात अशीच मोहीम चालू केली होती. गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सुलोचना काटकर यांची भेट घेऊन डॉ. विली डिसोझा यांनी नेतृत्व बदलाची मागणी केल्याचे मगो आमदार विनायक चोडणकर यांनी पत्रकारांना सांगून खळबळ माजवली. डॉ. विली यांनी या वृत्ताचा इन्कार केला. दावे-प्रतिदाव्याच्या या फैरीमुळे लोकांची बरीच करमणूक झाली. राणे नेतृत्व बदलाची मागणी करणारा आठ काँग्रेस आमदारांचा एक गट तयार झाला. डॉ. विली डिसोझा, सभापती फ्रोयलानो माशादो आदी आठ काँग्रेस आमदाराचा या बंडखोर गटात समावेश होता. मुख्यमंत्री राणे यांचे सरकार अल्पमतात असून अशा सरकारात आपल्याला रहायचं नाही असे म्हणत डॉ. विली डिसोझा यांनी मुख्यमंत्री राणे यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. डॉ. विलीच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, “बरं झालं सुंठीविना खोकला गेला” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  आमच्याकडे १५ आमदार आहेत असा दावा करत अल्पमतात असलेले राणे सरकार बरखास्त करून गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. गोवा प्रदेश इंदिरा काँग्रेस समितीचे सरचिटणीस जॉर्ज फर्नांडिस यांनी डॉ. विली डिसोझा यांचा हा दावा फेटाळून लावला व हिंमत असेल तर मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणा असे आव्हान त्यांनी दिले. ही गडबड चालू असतानाच शशिकला काकोडकर  गटाचे एक आमदार विष्णू रामा नाईक यांनी मुख्यमंत्री राणे यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राणे सरकारचे विधानसभेतील बळ, १७ झाले होते.

मगो पक्षाच्या अध्यक्षा शशिकला काकोडकर यांनी आपला मगो पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केला असून मगोचे ७ आमदार यापुढे काँग्रेस आमदार म्हणून काम करतील असे जाहीर केले होते. रमाकांत खलप व बाबुसो गांवकर या दोन मगो आमदारांनी श्रीमती काकोडकर यांच्या या निवेदनाला आव्हान देत मगो पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असा दावा केला. सदर ठराव मगो आमदार रमाकांत खलप यांनीच लिहिला होता असा दावा श्रीमती काकोडकर यांनी केला, तर तो केवळ मसूदा होता, तो बैठकीत संमत झालेला नाही; असे खलप यांचे म्हणणे होते. हा वाद बरेच दिवस चालला व अखेर भारतीय निवडणूक आयोगाकडे पोहोचला. 

मगो पक्षाच्या दोन आमदारांनी मगो ‌पक्षाच्या इंदिरा काँग्रेसमधील विलीनीकरणाला आव्हान दिल्याने मगो पक्ष संपणार नाही हे धूर्त राजकारणी पुरुषोत्तम काकोडकर यांच्या लक्षात आले. माजी मुख्यमंत्री असलेल्या श्रीमती काकोडकर यांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद देऊन बोळवण करण्यात आली. काँग्रेस (अरस) चे २० आमदार इंदिरा काँग्रेसमध्ये येऊन सरकार बनविल्याने दस्तुरखुद्द पुरुषोत्तम काकोडकर यांचेच स्थान दुय्यम बनले होते. अशा परिस्थितीत नाराज बनलेल्या श्रीमती शशिकला काकोडकर यांनी आपल्या आमदारांसह काँग्रेसचा त्याग केला.

निवडणूक आयोगासमोर चालू असलेल्या खटल्याचा निकाल बंडखोरांच्या बाजूने लागला. मगो पक्ष काँग्रेस ‌पक्षात विलीन करण्याचा निर्णय मगो पक्षाच्या आमसभेत घेण्यात आला होता हे सिद्ध करणारे कोणतेही दस्तऐवज मगो पक्ष आयोगासमोर पक्ष सादर करू शकला नाही. आमसभेची लेखी नोटीसही पक्षाकडे नव्हती. १५०० आमसभा सदस्यांना तोंडी नोटीस दिली होती असे मगोचे सरचिटणीस पुष्पशील केरकर यांनी आयोगाला सांगितले तेव्हा आयोगाच्या सदस्यांनाही हसू आवरले नाही. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मगो पक्ष विसर्जित केल्याचा दावा निवडणूक आयोगाने स्वीकारला नाही. मगो पक्षाचे दक्षिण गोव्यातील पहिले लोकनियुक्त खासदार मुकुंद शिंक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मगो पक्षाला ‘सिंह’ निशाणी प्रदान केली. निवडणूक आयोगाच्या या ऐतिहासिक निवड्यानंतर श्रीमती ताईंना मगो पक्षात परत घ्या अशी मागणी व मोहीम ताई समर्थकांनी उघडली. मगो पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. २० नोव्हेंबर १९८३ रोजी झालेल्या अधिवेशनात श्रीमती काकोडकर यांची मगो पक्षातून तहहयात हकालपट्टी करण्यात आली.

मगो पक्षातून ताईची आजीवन हकालपट्टी केली म्हणून चिडलेल्या ताई समर्थकांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा आग्रह धरला. मगो पक्षातील ताई समर्थकांनी बैठक घेऊन भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष (भाबांगो) हा पक्ष स्थापन केला. तिकडे काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या बंडखोरांनी ‘गोवा काँग्रेस’ हा नवा प्रादेशिक पक्ष स्थापन केल्याची घोषणा १४ सप्टेंबर १९८३ रोजी पणजीचे अपक्ष आमदार विष्णू अनंत नायक यांनी केली. या पक्षात काँग्रेसचे आठ आमदार सामील झाले होते. डॉ विलीनी नवा पक्ष स्थापन केला पण राणे सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र राज्यपालांना दिले नाही.

मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना १७ आमदारांचा भक्कम पाठिंबा होता.  सभापती  फ्रोयलनो माशादो यांच्याविरुद्ध सत्ताधारी पक्षाने अविश्वास ठराव मांडला. तो १७ विरुद्ध १२ मतांनी संमत झाला. श्रेष्ठींच्या आदेशानुसार मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले दयानंद नार्वेकर यांची सभापतीपदी वर्णी लागली. डॉ. विली डिसोझा यांचा  राजीनामा स्वीकारुन रिक्त पदावर बाणावलीचे आमदार मोंत क्रूझ यांना क्रीडामंत्री करण्यात आले! अवघ्या सहा महिन्यांत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी फातोर्डा स्टेडियम उभारण्याचा विक्रम त्यांनी केला होता.

२७ डिसेंबर १९८४ रोजी गोवा विधानसभा आणि लोकसभेसाठी एकाच दिवशी मतदान झाले. ३१ ऑक्टोबर ८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीच्या वातावरणात ही निवडणूक होत होती. गोवा काँग्रेस व भाबांगो हे दोन नवे प्रादेशिक पक्ष रिंगणात उतरले  होते. १९८० च्या निवडणुकीत डॉ. जॅक सिक्वेरा राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. त्याची म्हणजे युगोची जागा आपण घेऊ असे डॉ. विलींना  वाटत होते. मगो कार्यकर्ते आपल्यालाच उचलून धरतील असे भाबांगोच्या ताईचे मनसुबे होते.


गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)