रोमांचक सामन्यात दिल्लीचा मुंबईवर विजय

नतालिया सायव्हर-ब्रंटची​ खेळी वाया : शेफालीची फटकेबाजी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16th February, 12:20 am
रोमांचक सामन्यात दिल्लीचा मुंबईवर विजय

वडोदरा : वुमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील दुसरा सामना वडोदरा येथे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळविण्यात आला. अंतिम चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्लीने मुंबईचा २ गडी राखून पराभव केला. दिल्लीकडून शेफाली वर्माने १८ चेंडूत ४३ धावांची वादळी खेळी केली.
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजीला उतरला. मुंबईकडून यास्तिका भाटीया आणि हेली मॅथ्यूज यांनी डावाची सुरुवात केली. पण मॅथ्यूज तिसऱ्याच चेंडूवर बाद झाली. तिला शून्यावर शिखा पांडेने लॅनिंगच्या हातून झेलबाद केले.
त्यानंतर यास्तिका आणि नतालिया सायव्हर-ब्रंट यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण पाचव्या षटकात यास्तिकालाही शिखानेच ११ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर मात्र नतालियाला हरमनप्रीत कौरची चांगली साथी मिळाली.
या दोघींनी आक्रमक खेळताना जवळपास १० च्या धावगतीने धावा जोडत ११ व्या षटकापर्यंतच संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिला होता. पण ११ व्या षटकात हरमनप्रीतला ४२ धावांवर अॅनाबेल सदरलँडने बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. हरमनप्रीतन ४ चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी केली.
हरमनप्रीत आणि नतालिया यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली. ही दिल्लीविरुद्धची वूमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली.
हरमनप्रीत बाद झाल्यानंतर एमेलिया केर फलंदाजीला आली होती. तिने सुरुवातीला नतालियाला साथ दिली. नतालियाने ३६ चेंडूत तिचे अर्धशतकही साजरे केले. परंतु, १४ व्या षटकात अॅमेलिया अवघ्या ९ धावांवर धावबाद झाली.
त्यानंतर सजीवन साजना (१), अमनज्योत कौर (७) आणि संस्कृती गुप्ता (२) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्याने मुंबईच्या धावगतीला काहीसा लगाम लागला होता. तरी दुसऱ्या बाजूने नतालिया शानदार खेळ करत होती. मात्र तळातील फलंदाजही तिला साथ देऊ शकले नाहीत.जिंतीमणी कलिता (१) आणि शबनम इस्माईल (०) या दोघीही धावबाद झाल्या. इस्माईल तर एकही चेंडू न खेळताना धावबाद झाली. २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साईका इशाकलाही ऍनाबेल सदरलँडने माघारी धाडले. त्यामुळे मुंबईचा संघ १९.१ षटकातच १६४ धावांवर सर्वबाद झाला. नतालिया ५९ चेंडूत १३ चौकारांसह ८० धावा करून नाबाद राहिली.
दिल्लीकडून अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर शिखा पांडेने २ बळी घेतले. अॅलिस कॅप्सी आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरा दाखल खेळताना दिल्लीच्या संघाने सावध सुरुवात केली. मात्र १५ या वैयक्तिक धावसंख्येवर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग इस्माईलची शिकार ठरली. मात्र शेफालीने आपली फटकेबाजी एकाबाजूने सुरूच ठेवली. तिने २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १८ चेंडूत ४३ धावा केल्या. इतर खेळाडूंना विशेष काही करता आले नाही. मात्र मधल्या फळीतील फलंदाज निकी प्रसादने ३३ चेंडूत ३५ धावा करत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. तिला यष्टिरक्षक सारा ब्राइसने १० चेंडूत २१ धावा करून मोलाची साथ दिली. राधा यादव आणि अरुंधती रेड्डीने अखेरच्या चेंडूवर दोन धावा करत विजय साकारला.


शेवटच्या चेंडूवर यशस्वी पाठलाग
मुंबई विरुद्ध दिल्ली, बेंगळुरू, २०२४
दिल्ली विरुद्ध मुंबई, वडोदरा, २०२५*


डब्ल्यूपीएलमध्ये कमी अंतराने विजय
२ गडी राखून दिल्ली विरुद्ध मुंबई, वडोदरा, २०२५*
३ गडी राखून - यूपी विरुद्ध गुजरात, ब्रेबॉर्न २०२३
३ गडी राखून - युपी विरुद्ध गुजरात, डीवाय पाटील, २०२३


अखेरच्या षटकाचा रोमांच : (६ चेंडू १० धावांची गरज)

पहिला चेंडू : ४ धावा
दुसरा चेंडू : २ धावा
तिसरा चेंडू : १ धाव
चौथा चेंडू : १ धाव
पाचवा चेंडू : निकी प्रसाद बाद
सहावा चेंडू : २ धावा


आजचा सामना
गुजरात जाएंट्स वि. युपी वॉरियर्स
वेळ : सायं. ७.३० वा.
स्थळ : कोटंबी स्टेडियम, वडोदरा
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार