गोव्याच्या आरुष पावसकरला १७ वर्षांखालील फ्रान्स ओपनचे उपविजेतेपद

संघर्षमय लढतीत डेन्मार्कच्या अॅक्सल बोसेनकडून पराभूत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16th February, 12:13 am
गोव्याच्या आरुष पावसकरला १७ वर्षांखालील फ्रान्स ओपनचे उपविजेतेपद

१७ वर्षांखालील फ्रान्स ओपनचे उपविजेतेपद पटकावणारा गोव्याचा आरुष पावसकर. बाजूला विजेता डेन्मार्कचा अॅक्सल बोसेन चषकासह.

पॅरिस : येथे खेळविण्यात आलेल्या १७ वर्षांखालील बॅटमिंटन स्पर्धेत गोव्याच्या आरुष पावसकरने उपविजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याला डेन्मार्कच्या अॅक्सल बोसेनकडून १५-२१, २२-२०, २३-२१ असा संघर्षमय पराभव पत्करावा लागला.
थिवी, बार्देस येथील रहिवासी आरुष हा १७ वर्षांखालील गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा एकमेव बॅडमिंटनपटू होता. त्याने पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जाेएल जॉबीचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला. त्यानंतर त्याने फ्रान्सच्या व्हिक्टर ले रॉक्सचा २१-९, १४-२१, २१-१७ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने स्वित्झर्लंडच्य क्वेटिंग बॉशंगचा २१-१८, २१-९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडच्या साजन सेंथूरन याचा २४-२२, २१-१८ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र संघर्षमय लढतीत त्याला डेन्मार्कच्या अॅक्सल बोसेनकडून पराभव पत्करावा लागला. त्याच्या यशाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.