मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पर्वरीतील उड्डाणपुलाचे काम जलद गतीने
पणजी : पुढील १०० वर्षांचे लक्ष्य ठेवून, आम्ही आता रस्त्यांसाठी पायाभूत सुविधा तयार करत आहोत. "जर वाहतूक वाढली तर पुढील १०० वर्षांत आपल्याला काणकोण ते पेडणे या महामार्गावर कोणतीही नवीन रस्ते बांधण्याची गरज भासणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
पर्वरी चोगम रस्त्यानजीक राष्ट्रीय महामार्ग ६६ साठीच्या बायपास रस्त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री आणि माजी आमदार रोहन खंवटे यांच्यासह स्थानिक सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गेल्या १० वर्षात झालेला विकास पुढील २५ वर्षांच्या दूरदृष्टीने करण्यात आला आहे. आम्ही ज्या पायाभूत सुविधा तयार करत आहोत त्या पुढील १०० वर्षांत बांधण्याची गरज नाही. यामध्ये अटल सेतू, झुवारी पूल आणि सध्या सुरू असलेला पर्वरी उड्डाणपूल यांचा समावेश आहे.
पेडणे ते काणकोण पर्यंतचे उर्वरित रस्ते जोडण्याचे काम सुरु असून पुढील १०० वर्षांत कितीही वाहतूक वाढली तरी राष्ट्रीय महामार्गाचे पुन्हा काम करावे लागणार नाही, असे सावंत म्हणाले.
पणजी नंतर पर्वरी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. सचिवालय आणि उच्च न्यायालयामुळे रहदारी वाढली आहे. सद्यस्थितीत विकास कामे करताना काही अडचणी येत असून त्याचा सामना पर्वरीवासीयांना करावा लागत आहे.
सध्या ज्या गतीने उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. एवढी गती यापूर्वी कोणत्याही प्रकल्पाची नव्हती. हा प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कळंगुट, म्हापसा दिशेची वाहतूक कोंडी होणार कमी
कळंगुट समुद्रकिनारा किंवा म्हापसा येथे जाताना होणारी वाहतूक कोंडी आगामी काळात कमी होऊन वाहतूक जलद होईल. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना या रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र कालांतराने त्यात अडथळे येऊन हे काम प्रलंबित राहीले.
'आम्ही या पहिल्या भागाचे उद्घाटन केले असून सपना हॅबिटॅट जंक्शन येथे दुसरा भाग उघडून बॅकर स्ट्रीट जंक्शनशी जोडल्यानंतर, ग्रीन हिल ते चोगम रोडपर्यंतचा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल,' असे खंवटे म्हणाले.