इंडियन सुपर लीग : मुंबई सिटी एफसी होमग्राउंडवर पुन्हा फेल
मुंबई : गत विजेता मुंबई सिटी एफसी होमग्राउंडवर पुन्हा अपयशी ठरला. इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) महत्वपूर्ण लढतीत बुधवारी यजमान संघावर एफसी गोवाकडून १-३ अशा पराभवाची नामुष्की ओढवली. दुखापतीतून सावरलेला पाहुण्यांचा स्ट्रायकर इकेर ग्वारोटक्सेनाने दोन गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई सिटी एफसीचा एकमेव गोल खेळ संपायला काही सेकंद शिल्लक असताना पेनल्टी किकवर झाला.
अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेनावर झालेल्या लढतीत ०-२ अशा पिछाडीनंतर उत्तरार्धात मुंबई सिटी एफसीकडून चुरशीची लढत अपेक्षित होती. त्यांनी खोलवर चाली रचताना गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, यजमानांचे नशीब जोरावर नव्हते. दुसरीकडे, पाहुण्यांनी सर्वोत्तम सांघिक खेळात कमालीचे सातत्य राखले. तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीवर दडपण कायम ठेवले.
६४व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्रात मुंबई सिटी एफसीचा गोलकीपर लचेंपा याला व्यवस्थित पकडता करता आला नाही. त्याचा फायदा उठवत बोर्जा हेरेराने अगदी सहज चेंडूला गोलपोस्टमध्ये ढकलले. पाहुण्यांचा हा तिसरा गोल होता. ६६व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्टीझच्या क्रॉसवर जॉन टोरलला यजमानांसाठी गोल करण्याची संधी होती. मात्र, त्यात त्याला अपयश आले. अतिरिक्त वेळेतील सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकवर लालियानझुआला छांगटेने गोल करत यजमानांची लाज राखली.
तत्पूर्वी, पहिल्या सत्रात दोन गोल करताना पाहुण्यांनी यजमानांवर वर्चस्व राखले. प्रभावी आक्रमण करणाऱ्या एफसी गोवाने मुंबई सिटी एफसीच्या बचावफळीला सतत लक्ष्य केले. १७, १९ आणि २१ व्या मिनिटाला ब्रिसन आणि ब्रँडेन फर्नांडेस आणि इकेर ग्वारोटक्सेनाने मारलेले चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळून गेले. त्याचे फलस्वरुप इकेर ग्वारोटक्सेनाने २४व्या मिनिटाला यजमानांचा बचाव भेदला. उजव्या कॉर्नरने त्याने चेंडूवर नियंत्रण मिळवत उजव्या पायाने चेंडूला अचूक गोलजाळ्यात ढकलले. दुखापतीतून सावरणाऱ्या ग्वारोटक्सेनाने ४१व्या मिनिटाला पाहुण्यांची आघाडी वाढवली. उदंता सिंगच्या क्रॉसवर त्याने यजमानांचा गोलकीपर लचेंपा याला पुन्हा चकवले.
एफसी गोवा दुसऱ्या स्थानी कायम
या विजयाने एफसी गोवाने मुंबई सिटी एफसीची सलग १३ अपराजित सामन्यांची मालिका संपुष्टात आणली. तसेच २० सामन्यातून ३९ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यांचा हा ११वा विजय आहे. दुसरीकडे, मुंबई सिटी एफसीचे २० सामन्यातून ३१ गुण झालेत. ते सध्या पाचव्या स्थानी आहेत. यजमानांचा हा पाचवा पराभव आहे.
निकाल: मुंबई सिटी एफसी १ (लालियानझुआला छांगटे ९०+७व्या मिनिटाला) पराभूत वि. एफसी गोवा ३ (इकेर ग्वारोटक्सेना २४व्या आणि ४१व्या मिनिटाला, बोर्जा हेरेरा ६४ व्या मिनिटाला)