सुलेमान खानचा पोलिसांवर आरोप
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलेमान खानने पुन्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी बंदुकीची धमकी दाखवून दुसरा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ बनावट होता. त्याला विजेचा धक्का देऊन व्हिडिओ काढण्यास भाग पाडण्यात आले, असे त्याने सांगितले.
सुलेमान खान पोलीस कोठडीतून पळून गेला होता. पळून गेल्यानंतर, अॅड. अमित पालेकर यांना मिळालेला पहिला व्हिडिओ काँग्रेस पदाधिकारी सुनील कवठणकर यांनी व्हायरल केला होता. दुसरा व्हिडिओ पोलिसांमार्फत व्हायरल झाला.
जमीन हडप प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित सुलेमान खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडीची मुदत संपल्यामुळे पोलिसांनी त्याला कोठडीची मुदत वाढवून देण्यासाठी न्यायालयात आणले. न्यायालयातून बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना त्याने हे आरोप केले. कोठडी वाढविण्याच्या अर्जावरील आदेश न्यायालयाने राखून ठेवला. जिल्हा आणि सत्र न्यायालय २४ फेब्रुवारी रोजी एसआयटीच्या अर्जावर आदेश देईल. कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.