जमीन मालकावर होणार गुन्हा दाखल : दोन जेसीबी, चिरे कटिंग मशीन, पावर टिलर, जनरेटर जप्त
वाळपई : खाण खात्याच्या पथकाने शेळप सत्तरी येथील चिरेखाणीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात मशिनरी जप्त केली. यामध्ये ४ पावर टिलर, ४ चिरे कटींग मशीन, २ जेसीबी मशीन व ४ जनरेटर यांचा समावेश आहे. जवळपास एक कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
खात्याचे भूगर्भ शास्त्रज्ञ नितीन आतोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेअर स्नेहन सांगेलकर, गौरीश मयेकर, चंद्रकांत गावकर यांच्या पथकाने सदर छापा टाकला. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सदर पथक शेळपेतील चिरेखाणीच्या परिसरात पोचले असता मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन करण्याचे काम सुरू होते. छापा घातल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कामगारांची पळापळ सुरू झाली. मात्र, त्या ठिकाणी असलेली मशिनरी खाण खात्याच्या पथकाच्या हाताला लागली.
चिरेखाणी सुरू आहेत त्यांचा परवाना पूर्णपणे संपलेला आहे. तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून सदर भागांमध्ये बेकायदेशीर चिरेखाणीचा व्यवसाय सुरू आहे. चिरेखाणी सुरू असलेली जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे वन्यजीव कायदे अंतर्गत सदर भागांमध्ये चिरेखाणी चालवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यापूर्वी सदर खाणींवर धाड घालण्यात आली होती. या चिरेखाणी पुन्हा सुरू करण्यात येऊ नये, अशी ताकीद चिरेखाण मालक व जमीन मालकाला देण्यात आली होती. मात्र, त्याचे पालन न करता पुन्हा एकदा या चिरेखाणी सुरू करण्यात आल्या. या संदर्भाच्या तक्रारी खाण खात्याकडे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मशिनरी वाळपई पोलिसांच्या ताब्यात
जप्त करण्यात आलेली सर्व मशिनरी वाळपई पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या संदर्भात गुन्हा वाळपई पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला आहे.