२०१७ मध्ये राजबाग आगोंद येथे झाला होता खून
मडगाव : ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्या खून प्रकरणाच्या खटल्यावर न्यायालयाकडून गुरुवार, दि. १३ रोजी निकाल दिला जाणार आहे.
मडगावातील दक्षिण गोवा सत्र न्यायालयात डॅनियली मॅकलॉग्लिन हिच्या खुनप्रकरणी खटला सुरू आहे. सध्या याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. जलदगतीने या खटल्याची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी ४६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
काणकोण येथील राजबाग आगोंद येथे १३ मार्च २०१७ रोजी डॅनियलीचा खून झाला होता. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. या खुनामुळे विदेशातही याची चर्चा झाली होती. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी तपास केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा छडा लावून काणकोणातील भगतवाडा येथील संशयित विकट भगत याला अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय २४ वर्षे होते. विकट व डॅनियली यांच्यात मैत्री होती. खुनानंतर डॅनियलीचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर ७ जखमा होत्या.
काणकोण पोलिसांनी विकटवर न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्याच्यावर खून करणे, लैंगिक अत्याचार करणे, जबरी चोरी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. सरकारी पक्षाच्या वकिलाने या खटल्याची सुनावणी जलदगतीने करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सुनावणीला गती देण्यात आली होती. आता याप्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला असून १३ रोजी याप्रकरणी न्यायालयाकडून निवाडा सुनावला जाणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सुनावणी सुरू
संशयित विकटचे तुरुंगातील वर्तनही चांगले नसल्याने बेड्या घालून सुनावणीस आणण्याचा आदेश यापूर्वी न्यायालयाकडून दिलेला होता. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ही सुनावणी सुरू आहे.