मुलीला परदेशी शिक्षणासाठी व्हिसा देण्याचे भासवून फसवणूक
म्हापसा : कॅनडा येथे परदेशात मुलीला शिक्षणासाठी पाठवण्याकरीता व्हिसा देण्याचे भासवून पर्वरीतील एका महिलेला ९.६८ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी बी. पी. मणिकांत (रा. बंगळुरू) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना दि. २९ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०१४ या कालावधीत घडली. या प्रकरणी संजिना लुैतेल (रा. आल्तो पर्वरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला ही पर्वरीतील एका कॅसिनोमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते. या कॅसिनोमध्ये संशयित आरोपी बी. पी. मणिकांत याचे कॅसिनो खेळण्यासाठी येणे जाणे होते.
आपल्या मुलीला कॅनडामध्ये शिक्षणासाठी पाठवायचे आहे, असे फिर्यादी महिला संभाषणावेळी संशयिताकडे बोलून गेली. त्यावेळी संशयिताने शिक्षणासाठी व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन फिर्यादीला दिले. त्यासाठी लागणारी रक्कम देऊ असे तिने संशयिताला सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने वरील कालावधीत ९ लाख ६८ हजार ४७० एवढी रक्कम संशयिताकडे त्याने दिलेल्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरीत केली. ही बँक खाती आपली व मित्र परिवाराची असल्याचे त्याने फिर्यादींना भासवले.
रक्कम देऊन देखील आजतागायत व्हिसा मिळाला नाही. संशयित आरोपी कॅसिनोमध्ये आला नाही तसेच त्याचा संपर्कही होत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे तिला समजताच तिने पर्वरी पोलिसांनी तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दि. १० रोजी संशयिताविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१८(४) व ३१६(२) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिरोडकर करीत आहेत.