लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडिता गरोदर असल्याचे निष्पन्न
पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीने संशयितांना जामीन देण्यास कोणतीही हरकत घेतली नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने दोन्ही संशयितांना प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी दिला.
या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला नातेवाईकांनी जुलै २०२४ मध्ये दवाखान्यात नेले होते. तिथे तिची चाचणी केली असता, ती पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुलीचा जबाब बिगर सरकारी संस्थेमार्फत घेण्यात आला. त्यात तिच्यावर दोघा संशयितांनी अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३० जुलै २०२४ रोजी हरयाणा येथील पहिल्या संशयिताला तर २१ सप्टेंबर २०२४ रोजी हिमाचल प्रदेश येथील दुसऱ्या संशयिताला अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोघा संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर दोन्ही संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. दरम्यान, पीडित मुलीने दोन्ही संशयितांना जामिनावर सोडण्यास कोणतीही हरकत नसल्याची माहिती दिली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून दोन्ही संशयितांना प्रत्येकी ३० हजार रुपये, साक्षीदारांवर दबाब न टाकणे, मूळ गावचा पत्ता न्यायालयात सादर करणे व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.